पुणे | Pune
पुणे शहर आणि परिसराला सोमवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटात पडणाऱ्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. अवघ्या १२ तासांपेक्षा कमी कालावधीत शहरात तब्बल १०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
अनेक ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या तसंच शहरातील अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटनांमुळे वाहनांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल असून एका दुचाकीवर झाड पडल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्याच दरम्यान तब्बल १२ नागरिक पावसात अडकून पडले होते. त्या सर्वांची सुटका अग्निशामक विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी केली.
पुण्यातील पावसाचे व्हिडिओ आणि फोटो ट्विटर आणि सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. त्यासोबतच, पडत्या पावसात एकमेकांच्या मदतीला येणारे पुणेकरही दिसून आले. एकंदरीतच पुण्याचा रात्रीचा पाऊस यंदाच्या पावासाळ्यातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पाऊस झाल्याचं समजत आहे.