Saturday, September 14, 2024
Homeनगरअतिवृष्टीग्रस्तांना प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी - स्नेहलता कोल्हे

अतिवृष्टीग्रस्तांना प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरातील व्यापारी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आपदग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांची भेट घेऊन केली.

- Advertisement -

कोपरगाव शहरात आणि परिसरात सोमवारी रात्री चार ते पाच तास मुसळधार पाऊस झाला. या पावसाने अनेक व्यापार्‍यांच्या दुकानांमध्ये तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्नेहलता कोल्हे यांनी शहरातील गुरुद्वारा रोडवरील नेहरू भाजी मार्केट, वाणी कॉम्प्लेक्स व इतर ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आणि आपदग्रस्तांना धीर दिला.

पावसाने बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी तातडीने संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह धाव घेऊन पाणी बाहेर काढण्यासाठी मदत करून त्यांना दिलासा दिला. आपत्तीग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्या जेवणाची आणि निवार्‍याची व्यवस्था केली.

अतिवृष्टीमुळे शहरात हाहाकार उडालेला असताना प्रशासन मात्र बेफिकीर होते. अशावेळी प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहून संकटात सापडलेल्या लोकांना तातडीने मदत करणे गरजेचे होते. परंतु तहसील कार्यालय आणि नगरपरिषदेची प्रशासकीय यंत्रणा सतर्क नव्हती. प्रशासनाला अजिबात गांभीर्य नव्हते. एवढेच नाही तर एकाही अधिकार्‍याने नागरिकांचे भ्रमणध्वनी उचलण्याची साधी तसदीही घेतली नाही. मदत करणे तर दूरच. ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.

आता तरी प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी. मुख्याधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची त्वरित बैठक घेऊन पावसाने ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना ताबडतोब मदत करावी, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या