घोटी | जाकीर शेख Ghoti
इगतपुरी तालुक्यात शुक्रवार दि. २३ रोजी दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे इगतपुरी शहराच्या खालची पेठ भागातील येथील रहिवाशांच्या घरात थेट पावसाचे पाणी शिरल्याने येथील नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचे पाहावयास मिळाले.

गेल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे तापमानात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. तर अचानक आठवड्यापासुन पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांनीही चिंता व्यक्त केली होती. कारण काही ठिकाणी नुकत्याच भाताच्या आवण्या आवरल्या असल्याने या भात पिकांना पाण्याची आवश्यकता होती.
पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तर या पावसामुळे हवेत गारवा पसरल्याने उकाड्यापासुन हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले होते.
शहरातील जुन्या मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमा झाल्याने या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत होती. तर सायंकाळी शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना ही या पावसाच्या पाण्यातून जावे लागल्यामुळे विद्यार्थ्यांचा गणवेश खराब झाला होता.