Saturday, April 18, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Rain : मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर

मुंबई । Mumbai

राज्यभर पावसाने जोर धरला असून, मुंबईत आज (१८ ऑगस्ट २०२५) सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

- Advertisement -

मुंबईतील रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचायला सुरुवात झाली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. या परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. म्हणजेच, दुपारी १२ वाजल्यानंतर सुरू होणाऱ्या सर्व शाळा आणि महाविद्यालये आज बंद राहणार आहेत. सकाळच्या सत्रात आलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याचे निर्देशही शाळांना देण्यात आले आहेत.

मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांबरोबरच, कार्यालये लवकर सोडली जातील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांना नियमित वेळेतच कामावर राहावे लागणार आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईतील अनेक भागांत रस्ते जलमय झाले असून, पाणी साचल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. बेस्ट बसेसला पर्यायी मार्ग वापरावा लागत आहे, तर उपनगरी रेल्वे वाहतुकीत विलंब होत आहे.मुंबईत पावसाचा जोर पाहता पालकांनीही मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिका दक्ष आहे.

मुंबईत सुरू असलेला हा मुसळधार पाऊस आणखी काही तास कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन, शाळा, महाविद्यालये तसेच वाहतूक व्यवस्था सतर्कतेच्या स्थितीत आहेत.

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांना ब्रेक

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai यंदाच्या जनगणनेच्या कामासाठी पुन्हा एकदा शिक्षकांना जुंपण्यात आले आहे. जनगणना करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून राज्य सरकारने यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या...