Saturday, June 15, 2024
Homeनाशिकनाशिकच्या निवडणुकीत हेविवेट उमेदवारांमुळे चुरस निर्माण होणार

नाशिकच्या निवडणुकीत हेविवेट उमेदवारांमुळे चुरस निर्माण होणार

नाशिक | Nashik | रविंद्र केडिया
नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे नाशिकच्या शिवसेनेने हॅट्रिक मारण्याची व इतिहास रचण्याची तयारी केली असून या निमित्ताने नाशिक मधील लोकसभेची लढत चौरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्यावतीने उमेदवारी जाहीर करण्यासाठी सातत्याने बैठका सुरू होत्या. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेनेच्या माध्यमातून इच्छुकांची चाचपणी करण्यात येत होती. मात्र उमेदवार जाहीर करण्यासाठी सुमारे ३० ते ३५ दिवसांपासून प्रदीर्घ चर्चा सुरू होती. त्यामुळे नाशिकच्या लढतीमध्ये महायुतीचा उमेदवार कोण? असा प्रश्न विचारला जात होता.

या पार्श्वभूमीवर मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार असलेले छगन भुजबळ यांनी खोचकपणे उमेदवारी माघारी पर्यंततरी उमेदवार जाहीर करा असा टोला मारला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देत विजय हॅट्रिक साधण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नाशिकच्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर हेमंत गोडसे यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांनी फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद साजरा करत विजयाचा दावा केला.

यावेळी भाजपाच्यावतीने उमेदवारीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मात्र आपण नाराज असल्याचे स्पष्ट केले. आपण तीन वर्षांपासून वरिष्ठांच्या आदेशावरून लोकसभा मतदारसंघात मोटबांधणी करण्याची तयारी करीत होतो. मात्र ऐनवेळी शिवसेनेला तिकीट दिल्यामुळे नाराज असल्याची भावना व्यक्त केली. ही जागा भाजपचीच आहे असेही त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधून पुढील निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

या लढतीबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांच्याशी संवाद साधला असता निवडणुकीत आव्हान तर राहणारच आहेत. आपण हे आव्हान सक्षमपणे पेलून विजय निश्चित करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

या निवडणुकीत आता शिवसेनेच्या वतीने हेमंत गोडसे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे, वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर, जय बाबाजी परिवाराचे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्यात खरी लढत होण्याची चिन्ह आहे. त्यामुळे नाशिकची निवडणूक ही चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

कमी वेळेत प्रचार यंत्रणा उभारणे शिवसेनेपुढे आव्हान
लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी शिवसेनेच्या हातामध्ये अवघे १८ दिवस आहेत. या कालावधीत संपूर्ण मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबवण्याची मोठे आव्हान महायुतीसमोर असणार आहे. यासोबतच उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या इच्छुकांची दिलजमाई करण्याचेही काम करावे लागणार असल्याने या सर्व कामांची सांगड करून प्रचार यंत्रणा गतिमान करण्याचे हे शिवधनुष्य पेलावे लागणार असल्याचे चित्र आहे.

उद्या भरणार उमेदवारी अर्ज
महायुतीच्यावतीने उमेदवारी जाहीर करण्यात सातत्याने विलंब होत होता, शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या डॉ. भारती पवार व हेमंत गोडसे हे दोनही उमेदवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या