Sunday, May 18, 2025
Homeनाशिकराज्यात ‘जिवंत सातबारा’ मोहिमेतून पाच लाख उताऱ्यांवर वारस नोंदी

राज्यात ‘जिवंत सातबारा’ मोहिमेतून पाच लाख उताऱ्यांवर वारस नोंदी

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

महसूल विभागाच्या ‘जिवंत सातबारा’ मोहिमेमुळे शेतकऱ्यांसाठी जमिनीच्या मालकी हक्कांच्या नोंदी सुलभ करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने, आतापर्यंत राज्यातील पाच लाखांहून अधिक सातबारा उताऱ्यांवर वारसांच्या नोंदी पूर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे, वारस नोंदी अद्ययावत करण्याचा महसूल विभागातील हा आजवरचा विक्रम आहे.

सुमारे २२ लाख उतारे अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निश्चित केले असून अनावश्यक आणि कालबाह्य नोंदी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महसूल विभागाने या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला, महाराष्ट्र दिनापासून सुरुवात केली असून, यामुळे सातबारा उतारा अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक होत आहे.

या मोहिमेत मृत खातेदारांची नावे काढून कायदेशीर वारसांची नोंद केली जात आहे. राज्यातील ४५ हजार गावांमध्ये प्रत्येक गावात किमान ५० उताऱ्यांवर नोंदी होणार आहेत. ई-फेरफार प्रणालीद्वारे तलाठी आणि मंडळ अधिकारी हे काम करत आहेत. यासोबतच ‘अपाक शेरा’, ‘एकुम नोंद’, ‘तगाई कर्ज’, ‘भूसुधार कर्ज’, ‘पोकळीस्त’ यासारख्या कालबाह्य नोंदी हटवल्या जात आहेत. भूसंपादन निवाडा, बिनशेती आदेश, पोटखराब क्षेत्राचे रूपांतर, स्मशानभूमी नोंदीही अद्ययावत होत आहेत.

बुलढाणा आणि अकोला येथील यशस्वी प्रयोगानंतर ही मोहीम राज्यभर राबवली जात आहे. शेतकऱ्यांना मृत्यू प्रमाणपत्र, आधार कार्ड, वारस प्रमाणपत्र सादर करावे लागतील. अद्ययावत उतारे भूलेख पोर्टलवरून डाउनलोड करता येतील. डिजिटल तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया सुलभ झाली आहे. ही मोहीम शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वास आहे.

जमिनीच्या खरेदी-विक्री, कर्ज, भूसुधार मोबदला यांसारख्या प्रक्रियांमध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत. मालकी हक्कांचे वाद कमी होऊन शासकीय योजनांसाठी अचूक आकडेवारी उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना न्यायालयात खेटे घालण्यापासून मुक्ती मिळावी यासाठी ही मोहीम निर्धाराने राबवित आहोत.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Onion Price : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. रविवारी राहाता बाजार समितीत...