भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झाच्या (Sania Mirza) टेनिसमधील कारकिर्दीची नुकतीच अखेर झाली. तिच्या निवृत्तीची चर्चा गेले काही महिने सुरुच होती. दुबईमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत ती अखेरचा सामना खेळली. खेळाडू एका अर्थाने कधीच निवृत्त होत नसतो. खिलाडूवृत्ती, अंगी बाणवलेली शिस्त, कोणत्याही प्रसंगाचा- ताणतणावाचा सामना करण्याचे कौशल्य आणि मार्गदर्शक बनण्याची क्षमता अशा अनेक गोष्टी खेळामुळे त्याच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक होतात.
जानेवारी महिन्यात सानियाने समाजमाध्यमांवर तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘निवृत्तीची घोषणा करताना डोळ्यात अश्रू आहेत आणि मन भरुन आलेय’ असे तिने म्हटले होते. दुबईमध्ये तिच्या अखेरच्या सामन्याचा साक्षीदार बनलेल्या प्रेक्षकांचीही तीच अवस्था होती. ती मैदान सोडत असताना प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात तिला मानवंदना दिली. सानिया (Sania) त्या मानवंदनेची हक्कदारच होती. सानियाने (Sania) 2003 साली व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले. तेव्हाही मुलींनी खेळात करियर करावे अशी समाजधारणा नव्हती. पण सानिया खेळत राहिली आणि तिची रॅकेट जोरदार फटके मारत राहिली. सानिया मिर्झा (Sania Mirza) होणे तिच्यासाठी सोपे नव्हते.
प्रचंड आत्मविश्वास, कमालीचा स्पष्टवक्तेपणा आणि निडरता ही तिच्या स्वभावाची काही खास वैशिष्ट्ये. मैदानातील स्पर्धांचा आणि त्याच बरोबरीने सामाजिक दबावाचा-ताणतणावाचाही सामना तिला कायमच करावा लागला. तिचे खेळणे, तिचे पोशाख, तिची आक्रमक वृत्ती, एवढेच कशाला तिचा विवाह देखील चर्चेचा आणि वादविवादाचा विषय ठरला. पण अशी अनेक आव्हाने तिने खणखणित फटके देऊन परतवून लावली. शारीरिक दुखापतींनाही ती अनेकदा पुरुन उरली. साधारण चार वर्षे तिचा जगातील सर्वोत्तम शंभर खेळाडुंमध्ये समावेश होता. पण पायाचा घोटा आणि मनगटाला झालेल्या दुखापतींनी तिच्या एकेरी सामन्यांवर कायमच्या मर्यादा आणल्या. पण त्यामुळे ती खचली नाही. उमेद तिने हरवू दिली नाही. वास्तवाचा स्वीकार करुन सानियाने दुहेरी प्रकारांवर लक्ष केंद्रीत केले. ती भारतीय आणि विदेशी खेळाडूंबरोबर खेळली. काही वेळा पराभव पत्करावा लागला तरी सहकार्यांचे कौतूक करण्याचा दिलदारपणा तिने कायमच दाखवला.
दुहेरी खेळताना दोन्ही खेळाडुंमध्ये सामंजस्य आणि शब्देविण संवाद असावा लागतो असे म्हणतात. सानियाकडे या दोन्ही क्षमता होत्या. स्वप्न कष्टसाध्य असतात हे तिने वारंवार सिद्ध केले. मुलींच्या खेळण्याचा मार्ग प्रशस्त केला. कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नसते आणि ध्येयापासून ढळायचे नसते हेच तिने दाखवून दिले. हीच समाजासाठी आणि विशेषत: खेळाडू होण्याचे स्वप्न पाहाणार्या मुलींसाठी मोठी उपलब्धी आहे. कुठे थांबायचे हे तिला उमगले. तथापि तिने फक्त टेनिस खेळणे थांबवले आहे.
खिलाडूवृत्ती नाही. टेनिसमधुन निवृत्त होण्याआधीच सानियाच्या नव्या डावाची घोषणा देखील झाली होती. मार्च महिन्यात पहिली महिला क्रिकेट प्रीमियर लिग खेळली जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) या संघाने सानिया मिर्झाची (Sania Mirza) मेंटॉर (Mentor) म्हणून नेमणूक केली आहे. महिला खेळाडूंना प्रेरणा देण्याची जबाबदारी ती पार पाडणार आहे. शिवाय हैद्राबाद आणि दुबईमध्ये टेनिस अकादमी (Tennis Academy) सुरु करणार असल्याचे तिने माध्यमांना सांगितले. तात्पर्य, खेळाडू कधीच निवृत्त होत नसतो. तो फक्त खेळणे थांबवतो. सानियाच्या दुसर्या डावाला शुभेच्छा.