Monday, November 18, 2024
HomeUncategorized#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-२१

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-२१

सौंदर्य प्रसाधने आणि मुलींचे आरोग्य

आपण सुंदर दिसावे,असे प्रत्येकाला वाटत असते. स्त्रियांना तर सुंदर दिसण्याचे विशेषच आकर्षण असते.त्यासाठी आपली त्वचा तजेलदार व उजळ व्हावी , चारचौघात आपण उठून दिसावे यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. व्यक्तीचे सौंदर्य वाढविणे आणि व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसावे यांसाठी तयार केलेल्या द्रव्यांना किंवा पदार्थांना सौंदर्यप्रसाधने म्हणतात.

- Advertisement -

चेहरेपट्टीत फेरबदल करणे , त्वचा तजेलदार दिसणे,केशभूषा करणे, डोळे आकर्षक दिसावे यांसाठी सौंदर्य प्रसाधने वापरले जातात. सौंदर्यप्रसाधनांचा वापर प्रागैतिहासिक काळापासून होत आलेला आढळतो. सौंदर्यप्रसाधने तयार करणे व त्यांचा उपचारांसाठी उपयोग करणे या गोष्टींची माहिती प्रगत व अप्रगत देशांत वा संस्कृतींत होती.

भारत, ईजिप्त, चीन इ. देश याबाबतीत एकेकाळी आघाडीवर होते. त्वचा मऊ,नितळ, सुंदर व कोमल करण्यासाठी भारतात फार पूर्वीपासून निरनिराळ्या प्रकारची सुगंधी उटणी वापरली जात आहेत. मला आठवतंय माझी आई, आजी मोहरी, हळद व तीळ यांच्यापासून तयार केलेले चूर्ण अंगाला लावीत. लहान बाळांना पण तेलाची मालीश करून डाळीचे पीठ लावून आंघोळ घालायचे.

काळानुरूप सौंदर्य प्रसाधनांचे स्वरूप बदलत गेलेले आढळते. सौंदर्यप्रसाधनांच्या प्रगतीला रसायनशास्त्राची बरीच मदत झाली. वैज्ञानिक पद्धतींचा वापर, अचूक मापनक्रिया, अंतिम उत्पादनांचे परीक्षण इत्यादींमुळे सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीला वैज्ञानिक शाखेचे स्वरूप प्राप्त झाले. अशा प्रकारे विज्ञान व तंत्रविद्या यांच्या आधारे सौंदर्य प्रसाधनशास्त्र ही विज्ञानशाखा पुढे आली.

हल्लीच्या काळात तर प्रसारमाध्यमांच्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमुळे उत्पादकांची चढाओढ सुरू आहे. आपलेच उत्पादन श्रेष्ठ हे पटवून देतात. पण आपल्यातलं सौंदर्य कशात आहे, हेच आपल्याला माहीत नसतं. आपले सौंदर्याचे आणि प्रेमाचे मापदंड आपण लहान किंवा मोठ्या पडद्यावरच्या तारकांकडे पाहून ठरवत असतो.

जाहिरातींचा भडीमार, सोशल मिडियावर सुंदर दिसण्यासाठी चढाओढ, या सर्वांचा परिणाम असा झालाय की अगदी लहान वयापासूनच मुली लिप्स्टिक सारखे मेकअप प्रॉडक्ट्स सहज वापरू लागतात. दिवसेंदिवस मेकअप किट मधलं सामान वाढतच जातंय .या वयात खरंतर शरीर अगदी संवेदनशील अवस्थेत असतं. हार्मोन्सच्या संचारामुळे शरीर वाढीला लागलेले असते. जनेंद्रियांची पण वाढ होत असते आणि त्याच वयात मासिक पाळी पण सुरू होते.

सौंदर्य प्रसाधन म्हणजे केमिकल्स चे मिश्रण जे त्वचेवर लावले जाते केसांवर लावले जाते व त्यामुळे त्वचा सुंदर दिसते. बरेच संशोधन केल्यानंतर असे लक्षात आले आहे की सौंदर्य प्रसाधनात जे केमिकल्स आहेत त्याचा महिलांच्या आरोग्याशी आणि आजारांशी खूप जवळचा संबंध आहे. सध्या आपण बघतो की महिलांमध्ये स्तनाचा, गर्भाशयाचा व अंडाशयाच्या

कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे . मासिक पाळीसुद्धा हल्ली नियमित येत नाही. पीसीओएस यामध्ये चेहऱ्यावर पुरळ येते नको तिकडे केस उगवतात ,वजन वाढते, मासिक पाळीच्या समस्या उद्भवतात आणि कालांतराने व्यंधत्वही येऊ शकते. त्याशिवाय केस गळणे, केस लवकर पांढरे होणे, चेहऱ्यावर काळे डाग पडणे, ओठांची त्वचा खराब होणे हे पण परिणाम दिसून येत आहेत.

अनेक सौंदर्य प्रसाधने वापरली जातात. फेस पावडर लिप्स्टिक,फाउंडेशन , त्वचा मुलायम करण्यासाठी मॉइश्चरायझर, त्वचा उजळ करण्यासाठी फेअरनेस क्रीम, न्हामुळे त्वचा खराब होऊ नये म्हणून सन स्क्रीन लोशन,डोळ्यांच्या मेकअप साठी मस्कारा आय लाइनर, केस सुंदर दिसावे म्हणून निरनिराळे शाम्पू, कंडिशनर, हेअर स्प्रे वापरले जातात.

या सर्व सौंदर्य प्रसाधनांमध्ये पॅराबेन, बीस फिनोल A, phathalate, petrochemicals, triclosan यासारखी शरिराला घातक अशी बरीच रसायने संशोधनात आढळून आलेली आहेत. लेड, कॅडबियम, क्रोमियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक धातू आढळून आले आहेत. रोज रोज ही सौंदर्य प्रसाधने वापरून या केमिकल्सचे शरीरात प्रमाण वाढत जाते आणि मग दुष्परिणाम दिसून येतात. आता तर पोटाचे कॅन्सर, पोटाचे विकार, मूत्रपिंडाचा कॅन्सर, मूत्रपिंडाचे आजार, मेंदूवर परिणाम, बुद्धिमत्तेवर परिणाम हे सुद्धा आढळून आलेले आहेत. संशोधन जेव्हा केले जाते त्यामध्ये रक्तामध्ये या घातक केमिकल चे प्रमाण वाढलेले सापडले आहे.

वाईट असे आहे की सकाळपासून मुली मेकअप लावून घराबाहेर पडतात.अगदी रात्रीपर्यंत तो मेकअप तिच्या चेहऱ्यावर असतो आणि असे वर्षानुवर्ष सुरू असते. त्याचा दुष्परिणाम लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. मग सौंदर्यप्रसाधने वापरायचेच नाहीत का? जरूर वापरावीत पण वापर मर्यादित असावा. शक्यतो अठरा वर्षाच्या आतील मुलींनी मेकअप न केलेला बरा. पूर्वीच्या महिलांसारखेच सुंदर दिसण्यासाठी घरगुती साधनांचा वापर करावा. सौंदर्यप्रसाधने विकत घेताना हलक्या दर्जाची न घेता जरा लेबल्स वाचून, Paraben free,BPA free,Phthalate free असे घ्यावे.

आपले सौंदर्याचे आणि प्रेमाचे मापदंड आपण लहान किंवा मोठ्या पडद्यावरच्या तारकांकडे पाहून ठरवत असतो. पण कोणत्याही जाहिरातींना भुलू नका. हल्ली तर नैसर्गिक स्रोत वापरून बनवलेली उत्पादनं उपलब्ध आहेत.ते खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे.सर्वात महत्त्वाचे आहार, विहार व व्यायाम या त्रिसुत्रीने सुदृढ आणि निरोगी आरोग्य मिळते. चेहऱ्यावर तजेलपणा व उजळ कांती होते. आत्मविश्वास वाढतो.तेच खरे सौंदर्य. आपण कसे दिसतो यापेक्षा आपण जशा आहोत तसेच स्विकारण्याची गरज आहे.

सौंदर्य नटण्यात नाही, विचारात आहे. सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे. सौंदर्य बाहेर कशात नाही, मनात आहे. आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण असतं. आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे. प्रेमाने बोलणं म्हणजे सुंदरता, आपलं मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता.बाह्य दिसण्यापेक्षा तुमचं मन सुंदर ठेवा.ते तुमचं खरं चिरकाल टिकणारे सौंदर्य आहे. त्याचे जतन करा.

डॉ. श्रद्धा वाळवेकर

स्री रोगतज्ञ

नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या