किशोरावस्था व व्यायाम का, किती व कोणता ?
एखादी व्याधी जडल्यावर किंवा तंदुरुस्तीसाठी वयस्कर स्त्री पुरुष व्यायाम करणे व्यायाम शाळेत जाणे हे आपण नित्यच बघतो .परंतु ,आपण घरातील किशोरवयीन मुला-मुलींच्या तंदुरुस्तीसाठी व्यायामाकडे अगदी सहजपणे दुर्लक्ष करीत आहोत.कमी शारीरिक हालचालींमुळे किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणा ,कमी उंची अशा अनेक समस्या वाढत आहेत.शाळा, शिकवण्या या चक्रात मुलांना वेळ नाही असे कारण दिले जाते,मिळालाच वेळ तर मोबाईल व टीव्हीच्या संगतीत व्यतीत केला जातो .
अमेरिकन अकॅडमीनुसार,
वय वर्षे ६ ते १७ या गटातील मुला-मुलींनी दररोज एक तास मध्यम ते जोरदार प्रकारातील व्यायाम करणे गरजेचे आहे.
नियमित व्यायाम करण्याचे फायदे..
1.नियमित केलेल्या व्यायामाने शारीरिक व मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते ह्या मुलांमध्ये बौद्धिक विकास अधिक होतो व एकाग्रता वाढते परिणामी अभ्यासात प्रगती दिसून येते.
2.सुखद संप्रेरके स्त्रवतात (हॅपी हार्मोन्स सिक्रीशन )त्यामुळे डिप्रेशनचे प्रमाण कमी होते .
3.शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रित राहते .
4.हाडे व स्नायू मजबूत होतात उंची वाढण्यास मदत होते
5.पुढील आयुष्यात उच्च रक्तदाब हृदयविकार मधुमेह यासारखे रोग होण्याचा धोका कमी होतो.
#hERHealth किशोरवयीन आरोग्य :भाग-१३
या वयातील मुला मुलींना व्यायामासाठी प्रेरित करण्यासाठी पालकांनी त्यांच्यासमोर योग्य आदर्श ठेवणे गरजेचे आहे ,कारण मुले अनुकरणातूनच जास्त शिकतात.
किती व्यायाम आवश्यक आहे??? कोणताही व्यायाम प्रकार योग्य प्रकारे व योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे,संतुलन आवश्यक आहे. या वयातील मुलांसाठी दररोज 60 मिनिटे मध्यम ते तीव्र प्रकारातील व्यायाम आवश्यक आहे.अति व्यायाम करणे हे सुद्धा एक प्रकारे दुष्परिणामकारकच असते.किशोरवयीन मुला-मुलींनी क्रियाशील व शक्तीवर्धक व्यायाम करणे गरजेचे आहे .
1. कार्डिओ प्रकारातील व्यायाम…
या प्रकारात अशा हालचाली असतात ज्याने तुमच्या हृदयाच्या ठोक्याची गती वाढते .जसे ,एरोबिक्स, पळणे ,जोरदार नृत्य करणे, फुटबॉल, बास्केटबॉल जोरात सायकल चालवणे, दोरी उड्या यासारख्या शारीरिक क्रिया.
#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१२
2. हाडे व स्नायू मजबुतीसाठी…
पोहणे, स्ट्रेंथ ट्रेनिंग ,वजन उचलणे, स्ट्रेचिंग यासारखे व्यायाम करणे गरजेचे आहे.या प्रकाराने शरीराची लवचिकता वाढते .वजनाचे व्यायाम यामुळे स्नायूंमध्ये बळकटी वाढते व खेळताना होणाऱ्या जखमान पासून बचाव होतो
3 .योग…
अनेक अभ्यासपूर्ण अहवालातून दिसून आले आहे की योगाभ्यासाने विद्यार्थी दशेत शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे होतात सूर्यनमस्कार हा एक उत्तम सर्वांग व्यायाम आहे.तसेच ताडासन, भुजंगासन ,पश्चिमोत्तानासन ,वृक्षासन, त्रिकोणासन, सर्वांगासन असे आसन नियमित करता येऊ शकतात
4. झुंबा…
सध्या तरुणाई मध्ये विशेषतः मुलींमध्ये लोकप्रिय होत असलेला हा व्यायाम प्रकार हा कार्डिओ प्रकारात मोडतो.आठवड्यातून किमान तीन ते पाच दिवस ४५ ते ६० मिनिट करणे फायदेशीर ठरते .या प्रकाराने शारीरिक लवचिकता वाढण्यास मदत होते.
जर एखादा मुलगा अथवा मुलगी स्थूल होऊन खूपच स्वस्त असेल, तर सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे व नंतर शारीरिक व्यायाम सावकाशपणे सुरू करता येतील.तसेच जर काही जुनाट आजार असेल अथवा विकलांग मुला-मुलींना देखील या गटात समाविष्ट करणे गरजेचे आहे.व्यायामानंतर अथवा व्यायाम करताना दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
मुख्यत्वे शारीरिक सौंदर्यासाठी व्यायाम करण्यापेक्षा खिलाडू वृत्ती व तंदुरुस्तीसाठी व्यायाम करावा ही भावना मुलांमध्ये रुजवली गेली पाहिजे.
व्यायामामध्ये नियमितता असणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे व्यायामाचा प्रकार आवडीचा असेल तर ते सहज साध्य करता येते .जसे ,प्रौढांमध्ये दोरी उड्या मारणे अत्यंत कंटाळवाणे असेल तर हेच या वयातील मुला-मुलींमध्ये आनंददायी असू शकते ,त्यामुळे अमुक एक प्रकारात अडकून राहण्यापेक्षा तुमच्या मनाला व शरीराला आनंद व आरोग्य देणाऱ्या व्यायामात सातत्य ठेवू शकता.
व्यायाम करा, आनंदी रहा, सुखी रहा!
डॉ.हिमांगिनी चौधरी .
स्त्री रोग तज्ञ .