Saturday, July 27, 2024
HomeUncategorized#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-२०

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-२०

Menstrual Hygiene

पाळीच्या वेळेस घ्यायची काळजी आणि स्वच्छता

- Advertisement -

मासिक पाळी हा प्रत्येक मुलगी, तरुणी आणि स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक स्त्री आयुष्यातील काही वर्षे म्हणजे वयाच्या सरासरी १२ ते ४५ वर्ष नियमितपणे याचा सामना करत असते. त्याकाळात म्हणजे ४ते ५ दिवसात आरोग्याची व एकंदर स्वच्छतेची काळजी घेणे अतिशय गरजचे असते. तसे न केल्यास आरोग्य विषयी समस्या उद्धभवू शकतात. म्हणूनच या बाबतींत जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी मासिक पाळी स्वच्छता दिवसही साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी २८ मे ला साजरा केला जातो.

मासिक पाळीच्या वेळेस स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर खाज येणे, जळजळ होणे, अंगावरून पांढरा स्त्राव जाणे, लघवीच्या जागेला जंतू संसर्ग होणे हया सारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

मासिक पाळीच्या वेळेस कोणती काळजी घ्यायची हे आपण जाणून घेऊ:

१) पाळीच्या वेळेस सनिटरी पॅड वेळोवेळी बदलणे

पाळीच्या वेळेस जो disposable pad वापरतो तो आपल्या शरीरासाठी घातक आहे, कारण त्या मध्ये जे पदार्थ असतात ते आपल्या त्वचेला हानिकारक आहेत. कालांतराने त्यामुळे कॅन्सर होण्याची पण शक्यता असते. त्याला पर्याय म्हणून कापडी पॅड किंवा menstrual cup वापरु शकता. त्याच बरोबर disposable pad निसर्गा साठी सुद्धा अतिशय हानिकारक आहेत. एका पॅड चे निसर्गा मध्ये विघटन होण्यास पाचशे वर्ष लागतात, तर इन्सेनेरेशन मध्ये त्याचे विघटन करताना लागणाऱ्या जास्त तापमानामुळे आपण हवेचे प्रदूषण वाढवतो.पॅड हे दर सहा ते आठ तासांनी बदलणे अत्यंत गरजेचे आहे. ते जर जास्त वेळ वापरले तर जंतुससर्ग होऊ शकतो.

२) स्वच्छ कपडे आणि अंतर्वस्त्रे वापरणे

मासिक पाळीत स्वच्छ धुतलेले व कोरडे कपडे वापरावे. अंतर्वस्त्रे नीट धुवून आणि ऊन्हात वाळवा. ओलसर , दमट कपडे घालणं टाळावे, त्यात अनेक प्रकारचे जिवाणू असू शकतात. कापडी पॅड हे सहा तास वापरल्या नंतर 15 ते 20 मिनिट गार पाण्यामध्ये भिजवून ठेवावे नंतर साबण लावून चोळून धुवावे व उन्हामध्ये वाळवावे. Menstrual cup हे वापरण्यासाठी अतिशय सोपे आहे. सहा तासानी हात स्वच्छ धऊन साध्या किंवा कोमट पाण्याने cup स्वच्छ धुवून परत वापरता येतो. कापडी पॅड आणि menstrual cup स्वतः साठी आणि निसर्गासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत.शिवाय ते खूप किफायतशीर आहेत कारण ते आपले पैसे सुद्धा वाचवतात

३) वैयक्तिक स्वछता राखा

मासिक पाळीत वैयक्तिक स्वछता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. पाळीच्या जागेच्या स्वच्छते साठी कोमट पाणी वापरू शकता. त्यासाठी कोणतेही रसायान युक्त उत्पादने वापरणे टाळा. प्रत्येक वेळी पॅड बदलल्या नंतर लगेचच साबणाने हात स्वच्छ धुवावे.

४) सकस आहार

मासिक पाळीत सकस आहार आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे थकल्या सारखे वाटत नाही. पुरेशी झोप घेणं ही या दिवसांत महत्वाचं आहे.

५) सक्रिय राहा

मासिक पाळीत अनेक महिलांना पोट दुखी, पाट दुखी, पाय दुखी अशा समस्या जाणवतात. हे टाळण्यासाठी योगासने करणे आवश्यक आहे.हे तुम्हाला मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनापासून मुक्त होण्यास मदत करेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात कुठेही अडथळा येणार नाही.

वरील सर्व गोष्टी आपल्या जीवनात समाविष्ट करून आपण फक्त स्वतः चाच नाही तर पर्यावरणाचा ही फायदाच करणार आहोत.त्यामुळे मासिक पाळीचे ते चार दिवस वेगळे न वाटता नक्कीच आनंददायी होतील यात शंकाच नाही.

डॉ. अर्चना खैरनार

स्री रोग तज्ञ

नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या