Sunday, May 26, 2024
Homeनगरवृध्द दाम्पत्यास मारहाण करुन दागिने, रोख रकमेची चोरी

वृध्द दाम्पत्यास मारहाण करुन दागिने, रोख रकमेची चोरी

वैजापूर | प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यातील राहत्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून वृध्द दाम्पत्यास लाकडी दांड्याने मारहाण करीत पाऊण लाखाचे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची घटना 21 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील शिवराई येथे घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शिवराई येथील बबाबाई एकनाथ डांगे (65) व त्यांचे पती एकनाथ डांगे जेवण आटोपून झोपी गेले. एकनाथ डांगे हे पाठीमागील खोलीत झोपले होते. रात्री 12 वाजेच्या सुमारास कुणीतरी दरवाजा ठोठावण्याचा आल्याने बबाबाई जागी झाल्या. परंतु त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्या दरवाजा उघडत नसल्याने चोरट्यांनी दरवाजा जोरात ढकलून उघडला अन् दोघे आत शिरताच बबाबाई ओरडल्या. त्यामुळे चोरट्यांनी त्यांना ‘ओरडू नकोस, अन्यथा मारून टाकीन’. अशी धमकी देऊन दागिने कुठे आहे? विचारणा करून त्यांनी मारहाण करायला सुरवात केली व त्यांच्या अंगावरील सोन्याचे मणी मंगळसूत्र, कानातील वस्तू हिसकावून घेतली.

ही आरडाओरड ऐकून शेजारच्या खोलीतून त्यांचे पती एकनाथ डांगे यांनी ‘कोण आहे ?’ असे म्हणत बाहेर आले. चोरट्यांनी त्यांना देखील लाकडी दांड्याने जबर मारहाण करून जखमी केले व बबाबाई याच्या गळ्याला चाकू लावून ‘ओरडू नको’ अशी धमकी देत ‘आणखीन पैसे व दागिने कुठे आहेत?’ अशी विचारणा केली. घाबरलेल्या बबाबाई यांनी गादीखाली पैसे असल्याचे सांगितले. गादीखाली ठेवलेले 22 हजार रुपये व जवळच असलेला मोबाईल फोन घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी बबाबाई डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातारण निर्माण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या