Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाकाबंदीचे बॅरीकेटस अडगळीत; महामार्ग पोलिसांंकडून दुर्लक्ष

नाकाबंदीचे बॅरीकेटस अडगळीत; महामार्ग पोलिसांंकडून दुर्लक्ष

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

नाकाबंदी करण्यासाठी व वाहने अडवण्यासाठी उपयोगात येणारे बॅरीकेटस् (Barricades) नाशिक-पुणे महामार्गाच्या (Nashik-Pune Highway) कडेला असलेल्या नालीत फेकून दिल्याचे दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे बॅरीकेटस् तशाच अवस्थेत असून महामार्ग पोलिसांकडून (Highway Police) याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

नाकाबंदी करण्यासाठी व वाहनांना अडवण्यासाठी पोलिसांना भक्कम असे लोखंडी बॅरीकेटस् (barricades) देण्यात येतात. साधारणत: एका बॅरीकेटस्चे वजन 100 किलोच्या आसपास असते. त्याला ढकलण्यासाठीही भक्कम असे चाके लावण्यात आलेले असतात. कोरोना (corona) काळात नाकाबंदी करण्यासाठी या बॅरीकेटस्चा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आल्याचेही बघायला मिळाले. येथील महामार्ग पोलिसांनाही असे बॅरीकेटस् मिळाले होते

नाशिक-पुणे महामार्गावर गोंदे फाट्याच्या पुढे पोलिसांकडून कोरोना काळात वाहनांची व नागरिकांची तपासणी करण्यासाठी या बॅरीकेटस्चा उपयोग करण्यात आला होता. मात्र, नव्याने मिळालेले हे बॅरीकेटस् आता रस्त्याच्या कडेला पडून असल्याचे दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच नाकाबंदीही सौम्य झाली. तेव्हापासून पोलिसांकडून या बॅरीकेटस् थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या नळीतच लोटून देण्यात आले आहेत.

त्यामुळे या बॅरीकेटस्ची अवस्थाही भंगारासारखी झाली असून त्यांची चाकेही गळून पडली आहेत. नळीत पावसाचे पाणीही साचत असल्याने आता या बॅरीकेटस्ला गंज लागल्याचे दिसत आहे. शासनाकडून एवढा खर्च करुन देण्यात आलेल्या या बॅरीकेटस्ची दुरवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बॅरीकेटस्ची दुरस्ती केल्यास ते पुन्हा वापरात येऊही शकतात. मात्र, अनेक महिन्यांपासून हे बॅरीकेटस् असेच पडून असून ते उचलून आपल्या कार्यालयाकडेही नेण्याची मानसिकता महामार्ग पोलिसांनी दाखवलेली नाही. त्यामूळे वापराविना नालीत पडलेले हे बॅरीकेटस् चर्चेचा विषय ठरले आहेत.

टपरीचालकाची शक्कल

महामार्ग पोलिसांकडून गोंदे फाट्याच्या पुढे नाकाबंदी करण्यात येत होती त्या ठिकाणी एकाने टपरी टाकून व्यवसाय सुरु केला होता. बॅरीकेटस्चा वापर कमी झाल्यावर पोलिसांकडून हे बॅरीकेटस् फेकून दिल्यानंतर या टपरीचालकाने चक्क आडोशासाठी त्यातील तीन बॅरीकेटस्चा वापर केल्याचे दिसत आहे. महामार्ग पोलिसही अधूनमधून या ठिकाणी चहाचा आस्वाद घेत बसलेले दिसून येतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या