Friday, November 22, 2024
Homeनगरएक वर्षात लागली रस्त्याची वाट; 10 कोटी गेले पाण्यात

एक वर्षात लागली रस्त्याची वाट; 10 कोटी गेले पाण्यात

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील उत्तर भारतीयांना पुण्यास जाण्यास सर्वात महत्वाचा आणि जवळचा ठरणार्‍या तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची एक वर्षाच्या आत वाट लागली असून अधिकार्‍यांनी दुसर्‍या थरात सदर रस्त्याचे काम चांगले होईल अशी केलेली बतावणी आता मोठी थाप ठरली असल्याचे उघड झाल्याने पहिल्याच पावसात खड्ड्यांचा महापूर आलेल्या या रस्त्याची आता डागडुजी सुरू असून 10 कोटी रुपये पाण्यात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत नजीकच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्त्यांच्या कामाबाबत कोटींची उड्डाणे दिसत असली तरी वास्तवात रस्त्यांची वाट लागली आहे. निधी मिळत असताना तालुक्यातील रस्ते मात्र सुरळीत होत नाही ही शोकांतिका आहे. काही वर्षांपूर्वी एशियन डेव्हलप विकास बँकेने या रस्त्यास 189 कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र राजकीय अनास्थेमुळे तो निधी येऊ शकला नाही. वास्तविक हा रस्ता केव्हाच चार पदरी होणे गरजेचे होते. कारण या रस्त्याच्या दोन्ही बाजूस मुंबई-नागपूर व नाशिक-पुणे हे दोन रस्ते राष्ट्रीय महामार्ग आहेत. मधला चाळीस किमी मार्गाचा केवळ अपवाद आहे. मात्र गतवर्षी झगडेफाटा ते वडगावपान या मार्गावर जवळकेपर्यंत रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे मोठमोठे फलक लागले होते.

मात्र रस्ता पुढे चालू आणि मागे रस्ता कधी नादुरुत होऊ? असा प्रश्न ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना विचारत होता. त्यावेळी विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी आवाज उठवूनही त्यावर कोणीही चकार शब्द काढला नाही. उलट सदर ठेकेदारास अभय मिळाले होते. तळेगाव मार्गे कोपरगाव-संगमनेर रस्त्याचा भाग असलेला झगडेफाटा-जवळके दरम्यान खराब रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी करण्यासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातून हा रस्त्याचे काम सुरू केले होते. मात्र रस्ता सुरू असतानाच मागे खराब होण्याचे काम वेगाने सुरू होते.

दरम्यान याच मार्गावर जवळके ते संगमनेर तालुका हद्दीतील रस्त्यास काहीही आर्थिक तरतूद झाली नव्हती. त्यासाठी खड्डे बुजविण्यासाठी मुरूम टाकण्याचे प्रताप या विभागाने केले होते. तेही पहिल्या पावसाच्या आत होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे हा रस्ता पुन्हा पूर्ववत झाला आहे. आजही अंजनापूर शिवारात विक्रमी खड्डे दिसून येत आहेत. त्यामुळे या मार्गावर लवकरच अपघातांची मालिका सुरू होणार आहे. जनतेच्या भाळी केवळ हात पाय मोडून घरात बसण्याची वेळ येणार आहे हे उघड आहे. त्यामुळे या रस्त्याच्या ठेकेदार आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी काय कारवाई करणार? हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या