अहिल्यानगर (प्रतिनिधी)
भिंगार उपनगरात एका अल्पवयीन मुलासह मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना गुरूवारी (5 फेब्रुवारी) घडल्या. मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर, मुलाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
भिंगार उपनगरातील महेशनगर येथे राहणार्या कोमल अर्जुन फरतारे (वय 16) हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली. कोमलने राहत्या घरात गळफास घेतल्याचे दुपारी लक्षात येताच शेजारी राहणारे गोविंद बलभीम खिळे (रा. सिटीझन कॉलनी, भिंगार) यांनी तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती दुपारी 1.25 वाजता उपचार सुरू होण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार शेख अधिक तपास करीत आहेत.
याच दिवशी सायंकाळी अहिल्यानगर ते भिंगार मार्गावरील भुईकोट किल्ल्याजवळ झालेल्या रस्ता अपघातात अब्दुल रहेमान मोमीन (वय 16, रा. मुकुंदनगर) या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत अब्दुल रहेमान याला त्याचे नातेवाईक आतिफ सय्यद यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी सायंकाळी 5.26 वाजता उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.





