Saturday, January 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBus Accident : भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; ८ जणांचा...

Bus Accident : भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

दिल्ली । Delhi

हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. हरिपुरधार येथे एक खासगी बस नियंत्रणाबाहेर जाऊन थेट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ही खासगी बस शिमला येथून कुपवीच्या दिशेने जात होती. दुपारी जेव्हा बस सिरमौर जिल्ह्यातील हरिपुरधारजवळ आली, तेव्हा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळली. या बसमध्ये साधारण ५० ते ६० प्रवासी प्रवास करत होते. दरीत कोसळताना बसचा भीषण आवाज झाला, त्यानंतर परिसरात एकच आरडाओरडा आणि किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या.

YouTube video player

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरी खोल आणि भाग दुर्गम असल्याने बचावकार्यात सुरुवातीला अडचणी येत होत्या. मात्र, स्थानिकांनी दोरखंडांच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. थोड्याच वेळात पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकेही घटनास्थळी दाखल झाली. जखमी प्रवाशांना दरीतून बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयांत हलवण्यात येत आहे.

सिरमौरचे पोलीस अधीक्षक निश्चिंत सिंह नेगी यांनी सांगितले की, या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. पोलिसांकडून सध्या मदतकार्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.

या अपघातातील जखमींपैकी पाच जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी संगडाह, ददाहू आणि नाहन येथील मोठ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये अडकलेल्या इतर प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. या भीषण दुर्घटनेवर हिमाचल प्रदेशचे उद्योगमंत्री हर्षवर्धन चौहान यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले आहे.

डोंगराळ भागातील अरुंद रस्ता, बसचा वेग की तांत्रिक बिघाड, यामुळे हा अपघात झाला, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हिमाचलमधील घाट रस्ते आणि वळणांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ताज्या बातम्या

देशदूत ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पोला’ शानदार सुरुवात

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या 'देशदूत' आयोजित तसेच ‘ए. सी....