Friday, September 20, 2024
Homeनगरहिंगोलीतील तलाठी हत्येचा राहाता महसूल कर्मचार्‍यांकडून निषेध

हिंगोलीतील तलाठी हत्येचा राहाता महसूल कर्मचार्‍यांकडून निषेध

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

हिंगोली जिल्ह्यात आडगाव रंजे या गावात तलाठी संतोष पवार तलाठी कार्यालयात काम करत असताना त्यांचा भोसकून खून केला. या घटनेचा निषेध करत राहाता तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी व राज्य तलाठी संघाच्यावतीने तहसीलदार अमोल मोरे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. हिंगोली जिल्ह्यामधील आडगाव रंजे येथे भरदिवसा तलाठी कार्यालयात तलाठी संतोष देवराव पवार यांचा शासकीय कामकाज करत असताना चाकूने भोसकून खून करण्यात आला. महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा प्रकारे एखाद्या सरकारी कर्मचार्‍यासोबत खुनाची घटना घडल्याचा प्रकार अत्यंत भ्याड, निंदनीय असून यामध्ये आरोपीची मानसिक विकृती दिसून येते. या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, राहाता यांनी काळ्या फिती लावून अत्यंत निषेध व्यक्त केला.

या घटनेमुळे राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी हे घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून एक दिवसीय लक्षवेधी काम बंद आंदोलन पुकारत आहे. आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी यादृष्टीने पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून व तज्ञ विधिज्ञामार्फत कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत. मयतांच्या कुटुंबियास किमान 50 लाख रुपयांची विशेष मदत शासनाने त्वरीत जाहीर करावी. भविष्यात त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या वारसांना अनुकंपाद्वारे तात्काळ शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे. राज्यात कलम 353 अजामिनपात्र गुन्हा हा जामिनपात्र करण्यात आला आहे. या सारख्या घटना घडू नयेत व सरकारी कर्मचार्‍यांवर वारंवार होणारे हल्ले होऊ नयेत यासाठी कायद्यात दुरुस्ती करून कलम 353 हे अजामिनपात्र करण्यात यावे. एवढेच नव्हे तर यासारखे इतर काही कायदे अस्तित्वात आणून कर्मचार्‍यांना सुरक्षा देण्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा व संरक्षण मिळावे.

या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात तसेच राज्यातील तलाठीच नव्हे तर संपूर्ण सरकारी कर्मचार्‍यांच्या भावना विचारात घेवून योग्य ते संरक्षण देण्याचा प्रयत्न व्हावा व पुन्हा अशा घटना होऊ नये म्हणून सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीस अत्यंत कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी राहाता महसूल कर्मचारी व राज्य तलाठी संघाच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष मुकुंद मस्के, नायब तहसीलदार हेमंत पाटील, नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे, राहाता मंडल अधिकारी मोहसीन शेख, तलाठी कृष्णा शिरोळे, निवडणूक शाखेचे सुधाकर ओहोळ, अनिल उगले मंडल अधिकारी शिर्डी, रमेश झेंडे मंडल अधिकारी अस्तगाव तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या