नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिकमध्ये पूर्वी शिलाहार, यादव वंशाची सत्ता स्थापन झाली होती. या सत्तेच्या अधिकाराखाली नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सायगावच्या वेशीवर सुमारे एक हजार ते 1100 वर्षे जुने असलेले गद्धेगळरूपी दानपत्र नाशिकमधील इतिहास संशोधकांना आढळून आले आहे.एचपीटी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रामदास भोंग, प्रा. भीमराज पगारे, वणी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. यशवंत साळुंखे आदींनी ते शोधले आहे.
याविषयी प्रा. भोंग यांनी सांगितले की, गद्धेगळ म्हणजे गद्धे (गाढव) व गळ (शिळा) हा कानडी शब्द आहे. शिलाहार, यादवकाळात अधिकारी, धार्मिक संस्था, व्यक्ती यांना या शासकाकडून जमिनीच्या व अन्य रूपात दान दिले जात होते. या दानाचा उल्लेख असलेला मजकूर व काही सांकेतिक चिन्ह असलेले दानपत्र शिलेवर कोरलेे जात. अशीच एक गद्धेगळ येवला येथील सायगावच्या सीमेवर आढळून आली. या शिळेवर वरच्या बाजूला सूर्य,चंद्र व गाढव कोरलेले आहे. यावरून या शिळेला गद्धेगळ म्हणतात.
या गद्धेगळाचे ऐतिहासिक महत्त्व असे की, नाशिकच्या इतिहासाच नव्हे तर भारताच्या इतिहासासाठीपण हा गद्धेगळरूपी पुरावा एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे. या शिळेवर कोरलेले चंद्र, सूर्य म्हणजे शासकांनी ज्यांना दान दिले ते त्या दानाचा उपभोग सूर्य, चंद्र असेपर्यंत वंशपरंपरेने उपभोगू शकतो, नाशिकमधील शिलाहार सत्तेची माहिती देणारा येवला येथील एकमेव पुरावा असावा. असा हा गद्धेगळरूपी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा स्मारकरूपी पुरावा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
कारण या गद्धेगळाचा वरचा भाग तुटला असून उरलेल्या भागावर रंग मारला आहे. त्यामुळे वेळीच हा गद्धेगळरूपी ऐतिहासिक स्मारकरूपी ठेवा नष्ट होईल. हे होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासन पुरातत्त्व विभाग, येवला सायगाव ग्रामपंचायत यांनी या स्मारकाचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे, असे प्रा. डॉ. भोंग, प्रा. डॉ. साळुंखे, प्रा. पगारे यांनी म्हटले आहे.