Thursday, June 13, 2024
Homeनगरवाळू वाहणार्‍या वाहनांना पकडूनही कारवाई नाही

वाळू वाहणार्‍या वाहनांना पकडूनही कारवाई नाही

संगमनेर |शहर प्रतिनिधी|Sangamner

- Advertisement -

तालुक्यातील हिवरगाव पावसा परिसरात बेकायदेशीर वाळू वाहणार्‍या वाहनांना पकडूनही या वाहनांवर महसूल पथकाने कारवाई केली नसल्याची घटना उघडकीस आली आहे. महसूल पथकाची ही संशयास्पद कामगिरी चर्चेचा विषय बनली आहे.

संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळुचा उपसा केला जात आहे. महसूल अधिकार्‍यांच्या व कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हा वाळू उपसा होतो आहे.तालुक्यातील हिवरगाव पावसा परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक केली जात आहे. हिवरगाव पावसा परिसरातील टोलनाक्याजवळ कॅनॉल शेजारी ओढ्याला जेसीबीच्या सहाय्याने वाळूउपसा करून तिची चार ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक केली जात होती.

याची माहिती मिळताच महसूल पथक सदर ठिकाणी पोहोचले. याठिकाणी चार ट्रॅक्टर मधून वाळूची वाहतूक सुरू होती. यापैकी एक ट्रॅक्टरला पकडण्यात महसूल पथकाला यश आले, तीन ट्रॅक्टर घेऊन वाळूतस्कर पळून गेले. मात्र पकडलेल्या ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई केली नाही. जेसीबी जप्त करण्यात आला नाही. पहाटेच्या सुमारास पथकासमोर वाळूतस्कर ट्रॅक्टर व जेसीबी घेऊन जातात, पथक काय करतं? पथकाकडे गाडी नाही का? पथक पाठलाग करू शकत नव्हतं का? असे अनेक तर्क-वितर्क आता समोर येत आहेत.

तालुक्यातील वाळू तस्करीकडे महसूलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याने महसूल कर्मचार्‍यांचे चांगलेच फावले आहे. वाळूची वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई न करणार्‍या पथकावर कारवाई कोण करणार? याबाबत चर्चा होत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यात होणार्‍या वाळू उपशाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या