अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आदर्शगाव हिवरेबाजार येथील डोंगराला शनिवार (दि.19) दुपारी आग लागली. यावेळी ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. पाच तास करण्यात आलेल्या प्रयत्नामुळे या ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आली.
पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरे बाजारमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित असल्याने तरुण व ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले.ग्रामस्थ व तरुण मंडळ तसेच ग्रामवन समितीचे सदस्य यांच्या अथक प्रयत्नातून आग तब्बल 5 तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आली.
गेल्या महिनाभरात हिवरे बाजारच्या डोंगराला वणवा लागण्याची हि तिसरी वेळ असून शेजारील गावातील शेतकर्यांनी शेताचा बांध पेटवून दिल्यामुळे डोंगराला आग लागली.सन 2018 पासून आतापर्यंत जवळपास 23 वेळा हिवरे बाजारच्या ग्रामस्थांनी डोंगराची आग विझवली आहे. हिवरेबाजार गावाने जलसंधारणात मोठे काम केलेले असून या परिसरातील डोंगरात मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन करण्यात आलेले आहे. मात्र, उन्हाळ्यात याठिकाणी आग लागण्याच्या घटना घडत असून यासाठी हिवरेबाजार ग्रामस्थ सामूहिक प्रयत्न करत उन्हाळ्यात पेटलेला वनवा आटोक्यात आणण्यासाठी सक्रिय असल्याचे दिसत आहे.