अंबासन । वार्ताहर Ambasan
ग्रामस्थांनी गावालगत लोकसहभागातून मोसम नदीवर बांधलेल्या बंधार्यास संरक्षक भिंतीअभावी भगदाड पडून मोठ्या प्रमाणात बंधार्यातील पाणी वाहून जात आहे. या पाण्याच्या प्रवाहाने बंधार्यालगत असलेली जमीन धसत असल्याने काठावर राहत असलेल्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरे सोडून गावात आश्रय घेतला आहे. संरक्षक भिंत अथवा धक्का न बांधल्यास भविष्यात मोसमला मोठा पूर आल्यास जमीन पुर्णत: धसण्यासह पुलास देखील धोका निर्माण होवू शकणार असल्याची भिती ग्रामस्थांतर्फे व्यक्त केली जात आहे.
बंधार्यामुळे अंबासनसह परिसराचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. मात्र बंधार्याच्या उत्तरेस संरक्षक भिंत व धक्का न बांधल्याने उत्तरेच्या बाजूस भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पुन्हा पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकणार आहे. यामुळे संबंधित विभागाने बंधार्याला संरक्षक भिंत अथवा धक्का तातडीने बांधण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे जोर पकडू लागली आहे.
गावात सात-आठ वर्षापुर्वी पिण्याच्या पाण्याचे तीव्र संकट जाणवत असल्याने ज्येष्ठ नेते नारायण कोर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी एकत्र येत खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली 35 लाखावर लोकवर्गणी गोळा करत बंधार्याची निर्मिती केली. सदर बंधारा बांधतांना शासनाच्या अनेक अडचणींना ग्रामस्थांनी समर्थपणे तोंड देत हा बंधारा बांधला. मात्र पैशाअभावी संरक्षक भिंत-धक्का बांधण्याचे राहून गेले होते.
या बंधार्यामुळे गावाचा पाणीप्रश्न सुटण्यास मोठी मदत देखील झाली होती. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे बंधार्याच्या उत्तरेस भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी मोसम नदीत वाहून जात आहे. हरणबारीच्या आवर्तनाने बंधारा भरला मात्र भगदाडामुळे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे पाणी राहणार नसल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.
संरक्षक भिंत बांधण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे संबंधित विभागास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने काम रखडले आहे. मंजुरी मिळताच कामास प्रारंभ केला जाईल, असे ग्रामपंचायतीतर्फे सांगितले जात असले तरी पडलेल्या भगदाडामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने बंधार्यालगत असलेली जमीन धसण्यास प्रारंभ झाल्याने थडीवर वास्तव्य करणार्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपली घरे रिकामी करत गावात आश्रय घेतला आहे.
जमीन धसण्याचे प्रमाण असेच राहिल्यास व नदीला मोठा पूर आल्यास मोराणेकडे जाणारा रस्ता देखील जमीन धसल्यामुळे बंद होण्यासह मोठा पूर आल्यास मोसम नदीच्या पुलाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेत ग्रामपंचायत व शासनाने या बंधार्यास धक्का किंवा संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.