मुंबई । प्रतिनिधी Mumbai
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करून महायुती सरकारने राज्यभरातील १४ लाखाहून अधिक कर्मचारी, अधिकाऱ्यांना होळीची भेट दिली आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के इतका झाला असून कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १ जुलै २०२४ पासून हा वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे.
जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ असा सात महिन्यांचा महागाई भत्ता फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात दिला जाणार आहे. महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाने सरकारी तिजोरीवर दरमहा १५० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
केंद्र सरकारने १ जुलै २०२४ पासून आपल्या कर्मचाऱ्यांना ३ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला. केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. मात्र, गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासारख्या लोकानुयायी योजना राबविण्यास सुरुवात झाल्याने वाढीव महागाई भत्त्याचा विषय मागे पडला होता.
वाढीव महागाई भत्ता लागू करावा, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर राज्य सरकारने वाढीव महागाई भत्त्याचा निर्णय घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. दरम्यान, या निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्य सरकारला धन्यवाद दिले आहेत.