मुंबई । Mumbai
राज्यभरात धुळवडीचा सण उत्साहात साजरा होत असताना बदलापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग धुवायला गेलेल्या चार मुलांचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
धुळवड खेळल्यानंतर आर्यन मेदर (१५), आर्यन सिंग (१६), सिद्धार्थ सिंग (१६) आणि ओमसिंग तोमर (१५) हे चौघे जण रंग काढण्यासाठी उल्हास नदीजवळ गेले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही नदीत बुडाले. ही घटना बदलापूरच्या चामटोली परिसरात घडली.
या घटनेनंतर पोलिस आणि स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर चौघांचे मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे मृत मुलांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धुळवडीच्या आनंदात अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळतो आहे. मुलांच्या मृत्यूमुळे चामटोली आणि परिसरात शोककळा पसरली असून या सणाला गालबोट लागले आहे.