सटाणा | प्रतिनिधी Satana
सटाणा मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत कॅशियरकडून नजरचुकीने एक लाख रुपये जास्तीचे दिले गेले असतानाही संबंधित रक्कम प्रामाणिकपणे बँकेकडे परत केल्याबद्दल बँकेचे खातेदार किशोर बागुल यांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
बँकेत व्यवहार करताना झालेल्या मानवी चुकीमुळे किशोर बागुल यांना देण्यात आलेल्या रकमेपेक्षा एक लाख रुपये अधिक मिळाले होते. सदर बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न करता तत्काळ बँकेशी संपर्क साधून सदरची रक्कम बँकेस परत केली.
बागुल यांच्या प्रामाणिक कृतीबद्दल बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन चेअरमन दिलीप येवला, संचालक कैलास येवला, जगदीश मुंडवरे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक मंडळातील सदस्य व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
आभार मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे यांनी मानले. बागुल यांच्या प्रामाणिक आणि जबाबदार कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




