करोनाकाळात आशा सेविकांनी युद्धपातळीवर काम करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. साधने अपुरी असताना दुर्गम भागात त्यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची दखल जगात घेतली गेली आहे. या सेवाकार्याबद्दल देशातील दहा लाख आशा सेविकांना जागतिक आरोग्य संघटनेने ‘ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले आहे. आता आशा सेविकांंच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार आणि जनतेची आहे.
करोनाकाळात आघाडीवर राहून मानवतेची सेवा केल्याबद्धल भारताच्या दहा लाख आशा सेविकांना जागतिक आरोग्य संघटनेने ‘ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले. आजघडीला ग्रामीण, दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी आशा सेविका महत्त्वाचे काम करतात. ग्रामीण भागातील महिलांना आरोग्याविषयी जागरुक करणे, मुलांचा प्राथमिक उपचार, पोषण जागरुकता आणि शिक्षण अनुकूल वातावरण तयार करण्याचे काम आशा सेविका करत असून त्यांचा सन्मान झाल्याने एकप्रकारे त्यांच्या कार्याची पोचपावती मिळाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशभरात 14 लाख अंगणवाडी केंद्रे असून त्यात 13 लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका, कार्यकर्त्या आणि 11 लाखांपेक्षा अधिक सहाय्यिका कार्यरत आहेत. करोनाच्या महासाथीत आशा वर्कर्सनी आपले आणि आपल्या कुटुंबाचे आयुष्य धोक्यात घालून करोनाबाधितांना शोधणेे आणि त्यांना तातडीने उपचार मिळवून देण्याचे काम युद्धपातळीवर केले. या कार्याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात कौतुक झाले. मर्यादित स्त्रोतांच्या बळावर आणि किरकोळ वेतनावर मानवतेसाठी किती मोठे काम होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कारप्राप्त आशा सेविकांचे, कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. आरोग्यदायी भारत घडवण्यासाठी आशा कार्यकर्त्या आघाडीवर आहेत आणि त्यांची सेवाभावी वृत्ती आणि दृढ संकल्प हे कौतुकास्पद असल्याचे मोदींनी नमूद केले. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेडोस अधनोम घेब्रेयेसिस यांंनी पुस्काराची घोषणा करताना म्हटले की, करोनाकाळात आशा सेविकांचे काम खूपच धाडसी आणि कौतुकास्पद राहिले आहे. याकाळात आशा सेविकांनी लहान मुलांचे लसीकरण, मातेची देखभाल करण्याचे कामदेखील केले आहे. एवढेच नाही तर सार्वजनिक आरोग्य, पोषण, स्वच्छता आदी क्षेत्रातही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
सध्या जगभरात असमानता, खाद्य असुरक्षा, संघर्ष आणि करोना संकट दिसत असताना आशा सेविकांनी अहोरात्र काम केले. पुरस्कार विजेत्या आशा सेविकांत सेवाभावी वृत्ती, मानवतावादी दृष्टिकोन आणि नि:स्वार्थ भाव दिसून येतो. आशा कार्यकर्त्या या ग्रामीण भागाला जोडणारा दुवा आहेत. त्यांनी मुलांचे लसीकरण, सार्वजनिक आरोग्य, उच्च रक्तदाब, पोषण, स्वच्छता, आरोग्यदायी जीवन या आघाडीवर सातत्याने काम केले. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य संवर्धन करणे आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचेही काम केले आहे. यापैकी बहुतांश अंगणवाडी सेविकांनी करोनाच्या लाटेत रुग्णांचा शोध घेण्यासाठी ‘डोअर टू डोअर’ तपासणी केली. अंगणवाडी ही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची पहिली पायरी असून ही केंद्र सरकारच्या आरोग्य जनजागृतीमध्ये मोलाचे योगदान देत आहे. त्यांचा उद्देश ग्रामीण भागातील कमकुवत वर्गांच्या लोकांना प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा आहे. पण राज्यपातळीवरच्या आरोग्यसेवेची साखळी सक्षम नसल्याने सर्वसामान्यांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचणे हे एक आव्हानच ठरले आहे.
रेफरल प्रणालीला सक्षम करणे आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या दृष्टीने 2005 मध्ये मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता म्हणजेच ‘आशा’ची भरती सुरू केली. आज देशभरात सुमारे साडेनऊ लाख आशा सहाय्यिका कार्यरत असून त्या आरोग्यासंबंधी जनजागृती करण्याचे काम करत आहेत. प्रशिक्षणप्राप्त आशा सेविकांकडून करोनाचे नियम पाळत रुग्ण निश्चित केले जातात, त्यांची माहिती गोळा केली जाते, संशयित बाधितांना होम आयसोलेट करण्यात येते. तसेच गंभीर प्रकरणात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आशा सेविका मदत करतात. करोनामुळे क्लिनिकल आणि डायग्नोस्टिक तपासणीला मागणी वाढली आहे. याशिवाय करोना लाटेत औषध आणि उपकरणांची वाढती मागणी पाहता प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी हा काळ अतिशय आव्हानात्मक ठरला आणि ठरत आहे. शहराप्रमाणेच मृत्युदराची चिंतादेखील महत्त्वाची आहे. अर्थात, आशा भगिनी या गोष्टीला चांगल्या जाणून आहेत. त्या फ्रंटलाईन आरोग्य कार्यकर्त्या नव्हे तर सामुदायिक सदस्यदेखील आहेत. त्यांनी तंत्रज्ञानाच्या आधारे करोनाबाबत सर्व स्तरात जनजागृती केली. लोकगीत आणि यूट्यूबच्या मदतीने करोनाचे नियम घराघरांत पोहोचवले. ‘मल्टिलेअर मास्क’साठी त्यांनी ओढणीची निवड केली.
आशा कर्मचार्यांशी केलेल्या चर्चेतून काही गोष्टी स्पष्ट होतात. त्या म्हणजे त्यांना त्यांंची जबाबदारी चांगली ठाऊक आहे. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केल्या. याशिवाय सामुदायिक सर्वेक्षणही केले. करोनाच्या जोखमीचे त्यांना आकलन होते. काही भागात पीपीई किट नव्हते, ऑक्सिमीटर नव्हते. अशा अनंत अडचणीत त्यांनी करोनाबाधितांवर लक्ष ठेवण्याचे काम केले. करोनाकाळात देशवासियांची सेवा करण्याबरोबरच मुलांचे आणि मातांच्या आरोग्यात सुधारणा आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. यात लसीकरणापासून ते कुपोषणाच्या आघाडीवर असणार्या आव्हानांचा समावेश होता. आशा सेविकांशिवाय पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम यशस्वी होण्याची शक्यता कमीच असते.
अलीकडच्या काळात आशा सेविकांच्या आंदोलनाच्या बातम्या या सर्वांना अस्वस्थ करणार्या आहेत. करोनाकाळात आघाडीवर राहिलेल्या अंगणवाडी सेविकांना रस्त्यावर का उतरावे लागते? आता जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या कामाला मान्यता दिली असताना सरकारने या कार्यकर्त्यांची सेवा कायम ठेवणे आणि त्यांना सन्मानजनक वेतन देण्याची जबाबदारी घ्यायला हवी. त्यांना साधने उपलब्ध करून देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जेणेकरून दुर्गम भागात काम करताना त्यांना अडचणी येणार नाहीत. ग्रामीण भागातील साक्षरतेचे लक्ष्य अजूनही गाठलेले नाही. अशावेळी आरोग्यदायी आणि कुपोषणमुक्त भारताचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आणखी जनजागृती आवश्यक असून ती आशा सेविकांशिवाय करता येणार नाही. ग्रामीण महिलांत बाळासाठी आईच्या दुधाचे महत्त्व पटवून सांगणे, मुलांसाठी पोषण आहार, कुटुंब नियोजन याबाबतही आशा सेविका जनजागृती करत आहेत.
करोनाकाळात आशा सेविकांनी युद्धपातळीवर काम करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. साधने अपुरी असताना दुर्गम भागात त्यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न केले. स्वत:चा जीव आणि कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालून त्यांनी करोना महासाथीत काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल जगात घेतली गेली आहे. त्यामुळे आता आशा सेविकांंच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार आणि जनतेची आहे.