Thursday, June 13, 2024
Homeक्राईमहुक्क्याच्या धुराचा तरूणाईला विळखा

हुक्क्याच्या धुराचा तरूणाईला विळखा

नगर शहरात हुक्का पार्लरचा सर्रास गोरखधंदा

अहमदनगर | सचिन दसपुते | Ahmednagar

- Advertisement -

शहरात हुक्का पार्लरची संस्कृती रूजली असून तरुणांची पावले याकडे वळू लागली आहेत. शहरातील नामांकित शाळा, महाविद्यालयातील तरुण पिढी आकर्षणापोटी व सहज उपलब्धतेमुळे हुक्क्याच्या धुरात आपले भविष्य हरवत चालली आहे. राज्यात बंदी घालण्यात आलेले हुक्का पार्लर नगर शहरात सुमारे 12 ते 15 ठिकाणी खुलेआम सुरू आहेत. पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये भरधाव आलिशान कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ती कार अल्पवयीन मुलगा चालवित होता आणि तो नशेत असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे नशेच्या गर्तेत सापडलेल्या तरुणाईची चर्चा संपूर्ण राज्यात झडत आहे.

पोलिसांकडूनही या घटनेनंतर कारवाई केली जात आहे. नगरमध्येही रात्रीच्यावेळी तीन दिवस नाकाबंदी करून दारूचे सेवन करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. मात्र दुसरीकडे शहरात खुलेआम सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे धाडस शहर पोलीस कधी दाखवणार? असा सवाल उपस्थित होत आहे. टिळक रस्त्यावरील एका प्रसिध्द हॉटेलच्या परिसरात, मनमाड रस्त्यावरील कॉटेज कार्नर परिसरातील एका हॉटेलमध्ये तसेच नामांकित शाळा, महाविद्यालय आणि नगर जिल्ह्यासह शेजारील बीड जिल्ह्यातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या तरुणाईचे वास्तव्य असलेल्या बालिकाश्रम रस्त्यावर खुलेआम हुक्का पार्लर सुरू आहेत. उच्चभ्रू लोकांची वसाहत म्हणून झपाट्याने विस्तार होत असलेल्या सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावरील श्रीराम चौक, गुलमोहर रस्त्यावरही हुक्का पार्लर सुरू आहे.

कल्याण रस्त्यावरही दोन ते तीन ठिकाणी तसेच सर्जेपुरा भागात हुक्का पार्लर चालकांनी आपले बस्तान बसविले आहे.
तंबाखूजन्य पदार्थात मोडणार्‍या हुक्का प्रकारावर राज्य शासनाने 2018 पासून बंदी घातली आहे. हुक्क्याच्या नशेला आहारी जाणारी युवा पिढीची संख्या वाढत आहे. शाळा, महाविद्यालय व विविध क्लासेससाठी नगर जिल्ह्यासह शेजारील बीड जिल्ह्यातून तरुणांची मोठी संख्या नगर शहरात वास्तव्यास आहे. या तरुणांना गिर्‍हाईक म्हणून हुक्क्यासाठी टार्गेट केले जात आहे. शहरातील 12 ते 15 ठिकाणी हुक्का पार्लर बिनबोभाटपणे सुरू आहेत. शहरासह उपनगरात खुलेआम सुरू असलेला हा गोरखधंदा तेजीत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना संपर्क केला जात आहे.

आकर्षक जाहिरातबाजी करून तरुणांना विविध व्यसने व नशेच्या आहारी ओढले जात आहे. शहरातील तरुण पिढी हुक्का पार्लरमध्ये रात्रभर झिंगत पडलेले असतात. रंगीबेरंगी आणि संगीताच्या तालावर ठेका धरणारी ही तरुणाई व्यसनाच्या अधीन झाल्याने त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. खून, खुनाचा प्रयत्न याबरोबरच हाणामारीचे प्रकार दररोज घडत आहेत. यामुळेही गंभीर सामाजिक समस्या बनत आहे. अशा हुक्का पार्लरमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. त्याचे गंभीर परिणाम पुढील पिढ्यांना सोसावे लागणार आहेत.

निकोटीनचा धूर
एका बंद खोलीत रंगीबेरंगी झगमगाट केलेला असतो. हुक्का ओढणार्‍यांसाठी हुक्का ओढण्याचे साहित्य व बसण्यासाठी खास व्यवस्था केलेली असते. धुराच्या माध्यमातून निकोटीन हा विषारी वायू तरुणांच्या नाकातोंडात शिरतो. 15 मिनिटांसाठी 150 ते 200 रूपये आकारले जातात.

युवतींचा सहभाग चिंताजनक
हुक्का पार्लरच्या ठिकाणी महाविद्यालयीन युवतींचा सहभाग आढळून आला आहे. हुक्का ओढणार्‍या बंद खोलीत युवक युवती येतात. नशेची झिंग चढल्यानंतर इतर चाळेही त्या ठिकाणी केले जातात अशी कुजबुज आहे. त्याला हुक्का पार्लर चालकांकडून परवानगी दिली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलीस व प्रशासन हा प्रकार कधी बंद करणार याकडे जनतेचे लक्ष आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या