Saturday, May 4, 2024
Homeनगररुग्णालयातील महिला कर्मचार्‍याच्या जेवणाच्या डब्यात टाकला विषारी पदार्थ

रुग्णालयातील महिला कर्मचार्‍याच्या जेवणाच्या डब्यात टाकला विषारी पदार्थ

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

येथील एका हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांपूर्वी भयानक प्रकार घडला. अधिकारी-कर्मचारी यांच्या वादातून चक्क एका महिला कर्मचार्‍याच्या जेवणाच्या डब्यात विषारी पदार्थ टाकून

- Advertisement -

तिला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा प्रकार तिच्या वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. सदर महिलेने रुग्णालय प्रमुखांच्या कानावर हा प्रकार घातल्याने संबंधित अधिकार्‍याला तातडीने रुग्णालयाच्या सेवेतून काढून टाकल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.

संगमनेरातील या रुग्णालयात वेगवेगळ्या कारणावरून व्यवस्थापक व कर्मचारी यांच्यात नेहमीच वाद होतात या व्यवस्थापकाची अरेरावी व मनमानी वाढूनही रुग्णालय चालकांचे त्याच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जाते.

या व्यवस्थापकाने एका कर्मचार्‍याचा मारही खाल्ला होता. वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या कामासाठी माहिर असलेला हा व्यवस्थापक आपल्या करामतीबाबत आवाज उठवणार्‍यांंचा आवाज दाबतो, अशी चर्चा ऐकावयास मिळते.

रुग्णालयातील एका महिला कर्मचार्‍याचे त्याच्यासोबत काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. सदर महिला दुपारी जेवणासाठी रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये जात असते. दोन दिवसांपूर्वी ती आपल्या जेवणाचा डबा घेऊन कॅन्टीनमध्ये जेवणासाठी गेली असता डब्यात विषारी पदार्थाचा वास तिला आला.

त्यामुळे तिने याबाबतची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केली मात्र तिच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. यामुळे संतापलेल्या या महिलेने थेट रुग्णालय प्रमुखांची भेट घेतली. रुग्णालयातील गैरप्रकार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून रुग्णालय चालकांनी या महिलेची समजूत काढली.

सावध झालेल्या या महाशयांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हे प्रकरण जागेवरच दाबून टाकले. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापकाचे तातडीने निलंबन करण्यात आल्याचे समजते. या दवाखान्यात सर्वत्र सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. डब्यात विष कुणी टाकले याचे चित्रीकरण या कॅमेर्‍यात नक्कीच झाले असणार.

दवाखान्यात रोगोरची बाटली कुणी आणली, कुणाच्या सांगण्यावरून महिलेच्या डब्यात विष टाकण्यात आले, असा सवाल संबंधित महिलेने केला आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यात तक्रार देण्याच्या मनस्थितीत सदर महिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या