अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणार्या रुग्णालयांची जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली. या तपासणीत 46 रुग्णालयांच्या नोंदणीसह अन्य बाबींमध्ये त्रुटी सापडल्या असून बहुतांशी ठिकाणी रुग्णालय प्रशासनाकडून मुंबई नर्सिंग अॅक्टमधील तरतुदींची अंमलबजावणी केली जात नसल्याचे समोर आले आहे. यामुळे संबंधीत रुग्णालयांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
मागील महिन्यांत आरोग्य संचालक डॉ. स्वप्नील लाल यांच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालयाची तपासणी मोहीम राबवण्यात आली. ग्रामीण भागात असणारी रुग्णालये हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा अंतर्गत येत असून शहरी भागातील रुग्णालयाचे नियंत्रण संबंधीत महापालिका अथवा नगर पालिका यांच्या अंतर्गत आहे. नगर जिल्ह्यात 14 तालुक्यात ग्रामीण भागात 677 नोंदणीकृत खाजगी रुग्णालय आहेत. या रुग्णालयांची नोंदणी, तसेच नियमित तपासणी जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या वतीने करण्यात येत असून तालुका पातळीवर असणार्या तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यावर या रुग्णालयाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. मागील महिन्यांत शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने या रुग्णालयाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार प्रत्येक रुग्णालयात मुंबई नर्सिंग अॅक्टमधील तरतुदीनुसार आरोग्य दरपत्रक, तसेच रुग्ण हक्क सनद व इतर माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागावर लावलेली आहे?, रुग्णालयात सेवा करणारे डॉक्टर व इतर कर्मचारी यांचे ओळखपत्र व पदवी प्रमाणपत्र आहे की नाही? त्या ठिकाणी कार्यरत डॉक्टरचे वैद्यकीय कौन्सिलकडे नोंदणी झालेली आहे?, संबंधीत रुग्णालयाची इमारत स्वतःची की भाडेकरावरील आहे ? संबंधीत रुग्णालयाचे इलेक्ट्रिकल स्ट्रक्चर ऑडीटसह जैविक कचरा व्यवस्थापनाचे ऑडिट झालेली आहे? रुग्णालयात मंजूर बेड आणि प्रत्यक्षात उपचारासाठी लावण्यात आलेले बेड यांची संख्या बरोबर आहे? रुग्णालयात उपलब्ध असणार्या सेवा (ओपीडी, आयपीडी) प्रस्तुती विभाग, सोनोग्राफी सेंटर, हेल्थ प्रोफेशन नोंदणी, एमआएस अहवाल याबाबतची तपासणी करण्यात आलेली आहे? याची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. यात जिल्ह्या 677 पैकी 46 रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळल्या असून संबंधित रुग्णालयांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
या ठिकाणी त्रुटी
जामखेड 13, राहाता 5, नगर 9 आणि कर्जत 19 यांचा समावेश आहे. दरम्यान तपासणी करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व रुग्णालयाची सखोल तपासणी करण्याची मागणी होत असून ती झाल्यास अनेक गोष्टी समोर येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नोंदणीकृत रुग्णालये
ग्रामीण भागातील नोंदणीकृत रुग्णालय संख्या कोपरगाव 49, पाथर्डी 14, शेवगाव 9, जामखेड 16, श्रीगोंदा 27, राहुरी 97, पारनेर 87, राहाता 129, रामपूर 3, नगर26, अकोले 69, संगमनेर 45, नेवासा 65, कर्जत 50 आहे.