अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पूर्वाश्रमीचे राजकीय पदाधिकारी आणि सध्या साखळी हॉटेल व्यवसायात जम बसवलेल्या एका कुटुंबाच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाच्या पुणे येथील पथकाने बुधवारी (14 ऑक्टोबर) सकाळाची छापे टाकले. या कारवाईदरम्यान विविध ठिकाणी कागदपत्रांची तपासणी आणि मालमत्तांची पडताळणी सुरू करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे शहरातील राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्राप्तिकर विभागाच्या पुणे येथील पथकाने ही कारवाई केली. बुधवारी सकाळी सात वाजताच एकाच वेळी विविध ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील हॉटेल्स, शहराच्या केडगाव उपनगरातील निवासस्थान तसेच पुण्यातील हॉटेल्स अशा विविध ठिकाणी पथकाने छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कुटुंबाशी निगडित एका बांधकाम व्यावसायिकाच्या निवासस्थानीही प्राप्तिकर पथकाने तपासणी केली. छापे टाकण्यात आलेल्या कुटुंबाचे शहरातील राजकीय क्षेत्रात संबंध असल्याने या कारवाईकडे विशेष लक्ष लागले आहे. हॉटेल व्यवसायासह अन्य व्यावसायिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र, या कारवाईमागील नेमके कारण काय, तपासात कोणती कागदपत्रे किंवा मालमत्ता समोर आली आणि पुढील कारवाईचे स्वरूप काय असेल, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
दरम्यान, प्राप्तिकर विभागाच्या अहिल्यानगर येथील कार्यालयाला तसेच स्थानिक पोलिसांना या कारवाईची अधिकृत माहिती नसल्याचे समजते. त्यामुळे संबंधित विभागांकडून अधिकृत तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही. पुणे येथील पथकाने थेट कारवाई केल्याने स्थानिक पातळीवर या छाप्यांबाबतची माहिती मर्यादित राहिली. या कारवाईतून नेमके काय निष्पन्न होते, संबंधित व्यावसायिक व्यवहारांची तपासणी कोणत्या दिशेने पुढे जाते आणि प्राप्तिकर विभागाकडून यासंदर्भात अधिकृत माहिती कधी जाहीर केली जाते, याकडे आता राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.




