Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखकार्यकर्तेपण भारी देवा

कार्यकर्तेपण भारी देवा

राजकीय पक्ष आणि नेत्यांसाठी कार्यकर्ते किती महत्वाचे असतात ते वेगळे सांगायला नको. कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी नेत्यांना काय काय करावे लागते हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले. कार्यकर्ते टिकवण्यासाठी प्रत्येक नेत्यांना कार्यकर्त्यांना चॉकलेट वाटावे लागते याची मनमोकळी कबुली त्यांनी दिली. अध्यक्ष वा लोकप्रतिनिधींच्या मागे माजी ही उपाधी लागते.

कार्यकर्ता मात्र कायम कार्यकर्ताच असतो असेही ते म्हणाले. युवा पिढीने राजकारणात यावे अशी अपेक्षा सगळेच नेते व्यक्त करतात. कार्यकर्ता कधीही माजी होत नाही असे म्हणून गडकरींनी कार्यकर्त्यांचा गौरव केला आहे. तथापि राजकारणात कायमच कार्यकर्ता बनून राहणे सद्यस्थितीत किती कार्यकर्त्यांना मान्य असू शकेल? राजकारणात निस्वार्थी कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत होती आणि स्वतःच्या खिशाला खार लावून हे कार्यकर्ते त्यांच्या पक्षासाठी राबराब राबले ही आता दन्तकथा वाटावी अशी सद्यस्थिती नाही का? पक्षनिष्ठा हेच अशा कार्यकर्त्यांचे चॉकलेट होते. पक्ष सांगेल ती जबाबदारी त्यांनी मनापासून निभावली. त्यांचा पक्ष सत्त्तेत असो वा नसो त्यांची निष्ठा अबाधीत राहिली. वर्षानुवर्षे असे कार्यकर्ते पक्षाचे संघटन होते. त्यांच्याच बळावर पक्ष मोठे झाले. पक्षाचा प्रचार त्यांनी अगदी बेंबीच्या देठापासून घोषणा देऊन केला. असे कार्यकर्ते हळूहळू दुर्मिळ होत चालले असावेत का? तसे का होत असावे याचे चिंतन पक्ष आणि त्यांचे नेते करतील का? सत्तेसाठीची साठमारी, राजकीय सुंदोपसुंदी, पक्षांपेक्षा मोठे होत चाललेले नेते, निष्ठेच्या बदललेल्या व्याख्या, साम, दाम, दंड आणि भेद यांनाच आलेले महत्व आणि त्यांच्या बळावर वाटली जाणारी तिकिटे हे वास्तव नाकारले जाऊ शकेल का? यामुळेच ‘आता राजकारण पहिल्यासारखे राहिलेले नाही’ या भावनेने निष्ठावान कार्यकर्ते अस्तंगत होत चालले असावेत का? कार्यकर्त्यांना सांभाळावे का लागते आणि त्यासाठी खिरापत का वाटावी लागते याचा विचार नेत्यांनी कधीतरी केलेला असू शकेल का? नेत्यांची वेगाने होणारी सर्वांगीण प्रगती पाहून कार्यकर्त्यांच्या महत्वाकांक्षाना पंख फुटत असावेत का? नेतेपदाची स्वप्ने त्यांनाही पडत असावीत का? राजकीय कार्यकर्तेही जागरूक होत आहेत.

- Advertisement -

कार्यकर्त्यांनी किती दिवस सतरंज्या उचलायच्या असा प्रश्नही ते विचारताना आढळतात. त्यांच्या महत्वाकांक्षेला नेत्यांनी दिलेले चॉकलेट खतपाणी घालत असावे का? चॉकलेटच्या खिरापतीमुळेच तथाकथीत स्वयंघोषित भाईंना देखील राजकारण खुणावू लागते. उच्च स्तरावरचे नेते नाही बनणे शक्य झाले तरी निम्न स्तरावरचे एखादे तरी पद वाट्याला यावे अशीच त्यांची इच्छा असते. सत्तेचे क्षणिक सुख त्यांच्या वाट्याला यावे यासाठी कोणताही मार्ग त्यांना वर्ज्य वाटत नसावा. सध्याच्या परिस्थितीत सर्वात जास्त कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत हे वास्तव आहे. पूर्वी कार्यकर्ते एका व्यक्तीचे नव्हे तर विचारधारेचे आणि तत्वांचे काम करायचे. सद्यस्थितीत त्यांचे अधिष्ठान किती नेत्यांना असावे? त्यांनाच नसेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांना असू शकेल का? कार्य कडवंचीत कर्त्यांचा फक्त वापर करून घेण्याची नवपरंपरा रुजली असावी का?त्यामुळेच राजकारण हे त्यांचे क्षेत्र नाही आणि नुसता कार्यकर्ता होणे उपयोगाचे नाही. तरुणांनी राजकारणात यावे ही नेत्यांची फक्त बोलाचीच कढी आहे अशी भावना व्यक्त करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत गेली तर त्यात नवल ते काय?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या