सगळीकडे शारदीय नवरात्र उत्साहात साजरे होत आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रीलाच देवीचे रुप मानले जाते. एका बाजूला देवीरुपी नारीशक्तीचा जागर सुरु असताना दुसर्या बाजूला मुलींचे आयुष्य मात्र अजुनही उपेक्षित आहे. पुढारलेले राज्य म्हणून देशात गौरवल्या जाणार्या महाराष्ट्रात मुली अजून किती काळ नकोशा राहाणार आहेत? पुण्यात नुकतीच उघडकीस आलेली घटना कोणाही संवेदनशील व्यक्तीचे मन विषण्ण करणारी आहे. एका व्यक्तीने 6 दिवसाच्या अर्भक मुलीला विकून टाकल्याचे उघड झाले. मुलगी विकून टाकलेल्या दांपत्याला पहिल्या दोन मुली आहेत. तिसरे अपत्य मुलगीच झाल्याने वडिलांचा संताप अनावर झाला. म्हणून निर्दयी बापाने मुलगी विकून टाकली.
घटना उघडकीस आल्यावर पोलीसांनी मुलीला ताब्यात घेतले आहे. ही घटना काही महिन्यांनी उघडकीस आल्याचे प्रसिद्ध वृत्तात म्हटले आहे. मुलीच्या वडिलांवर आणि ती मुलगी खरेदी करणारांवर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. मुलांच्या तुलनेत महाराष्ट्रात मुलींची संख्या कमी झाल्याचा निष्कर्ष त्या अहवालात नमूद आहे. पाच वर्षांपूर्वी राज्यात एक हजार मुलांच्या तुलनेत 924 मुली होत्या. ती संख्या आता 913 झाली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुलींची संख्या नऊशेच्याही खाली गेली आहे. नको असताना जन्म झालेल्या मुलींचे नाव ‘नकोशी’ ठेवण्याइतकी मुलींच्या जन्माबाबत अनिच्छा आढळते. कागदोपत्री देखील मुलींचे नाव नकोशीच टाकले जाते. अशा मुलींचे नामकरण करण्यासाठी उपक्रम राबवण्याची वेळ सामाजिक संस्थांवर येते. मुलगी नको म्हणून विकून टाकणे आणि तिला नकोशी म्हणणे हा निव्वळ कु्ररपणा आहेच. पण मुलगी नकोशी का होते याचाही विचार समाजधुरिणांनी करायला हवा.
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी मात्र परक्याचे धन हा दृष्टीकोन समाजात खोलवर रुजलेला आहे. मुलगा आईवडिलांना सांभाळतो. त्यांची देखभाल करतो. घराण्याचा नावलौकीक वाढवतो अशीच लोकांची धारणा आजही आढळते. त्यामुळेच एकाच घरातील मुलगा आणि मुलीला शिकवण्याच्या भूमिकेतही तफावत आढळते. मुलीच्या शिक्षणावर पैसा खर्च करण्यापेक्षा मुलाला शिकवले तर तो म्हातारपणाची काठी बनेल अशी पालकांची अपेक्षा असते. याशिवाय मुलीच्या विवाहाचा खर्च तिच्या पालकांनीच करण्याची आणि नवरा मुलाला हुंडा देण्याच्या परंपरा हेही मुलगी नकोशी होण्याचे एक कारण आहे. त्यामुळे मुलीला खूप शिकवण्यापेक्षा तिच्या लग्नासाठी पैसा साठवण्याकडेच बहुसंख्य पालकांचा कल असतो. हुंडाबंदीचा कायदा असला तरी त्याला बगल देऊन छुप्या पद्धतीने ही परंपरा पाळली जात असल्याचे लोकही जाणून असतात.
पण आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे. मुलामुलीच्या असमान संख्येचे दुष्परिणाम समाजाला अनुभवास येत आहेत. मुलींची संख्या कमी झाल्याने विवाहासाठी मुली मिळणे दुरापास्त आहेत. त्यामुळे हुंड्याला नकार देणे, विवाहाचा खर्च मुलगी आणि मुलाच्या पालकांनी मिळून करणे, साखरपुड्यातच लग्न लावणे अशा घटना घडत आहेत. काही पालक मुलींना उच्चशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देऊ लागले आहेत. मुलीही त्या संधीचे सोने करतात. अलीकडे बहुसंख्य परीक्षांमध्ये मुलीच अव्वल येत आहेत. सार्वजनिक क्षेत्रात, पुरुषप्रधान क्षेत्रात मुलींचा यशस्वी वावर वाढला आहे.
अनेक क्षेत्रे मुली गाजवत आहेत. मुली देखील विवाहानंतरही आपल्या पालकांची जबाबदारी समर्थपणे पेलू लागल्या आहेत. सासर आणि माहेर अशी दोन्ही घरांची देखभाल करु लागल्या आहेत. अशी उदाहरणे संख्येने भलेही कमी असतील पण ती प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहेत. समाज बदलाची चाहूल देणारी आहेत. बदलाची सुरुवात झाली आहे. सकारात्मक बदलांचा हा प्रवास आदिशक्ती यापुढेही निरंतर सुरुच ठेवेल अशी आशा वाटते.