सामान्य माणूस हाच नेत्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. नेत्यांना सामान्य माणसाचाच जास्त कळवळा आहे, पण तो देखावा असावा याचा साक्षात्कार सामान्यांना नुकताच झाला असेल. दसऱ्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी मेळावे आणि सभा पार पडल्या. अनेकांच्या यात्रांची सुरुवात झाली. सगळीकडे कार्यकर्त्यांची गर्दी ओसंडून वाहिली. विरोधकांनी जनकल्याणासाठी सरकारला धारेवर धरले तर सरकारने जनकल्याण योजनांचा पाढा वाचला.
कोणत्या कार्यक्रमाला किती गर्दी होती याचे आकडेही जनतेचे डोळे दीपवणारे ठरतील असेच होते. कोणत्या गावातून किती गाड्या आल्या आणि गेल्या, याचेही हिशेब लोकांच्या कानावर पडले. तथापि या सगळ्या भाऊगर्दीत सामान्य माणूस कुठे होता? विचारांचे सोने लुटण्यासाठी तो गेला असेल का? यांसारखे प्रश्न मात्र कोणालाच पडले नसावेत. कारण सामान्य माणसे त्यांच्याच विवंचनेत आहेत. आपल्या विवंचना कशा सोडवायच्या याच चिंतेत त्यांचा दसरा सण पार पडला असावा. हंगामी पावसाने गाशा अधिकृतपणे गुंडाळल्याचे सांगितले जाते. यंदा पावसाने त्याचे काम चोख पार पाडलेले नाही. राज्यातील अनेक गावे, वाड्या आणि वस्त्यांवर आज दुष्काळाचे सावट आहे. गेल्या वर्षी याच काळात राज्यात एकाही ठिकाणी पाणी टँकर सुरु नव्हता. यावर्षी मात्र एक हजारापेक्षा जास्त वाड्या आणि सव्वा तीनशेपेक्षा जास्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात ही आकडेवारी दिलेली आहे. ऑक्टोबरमध्येच ही परिस्थिती असेल तर मे महिन्यात कसे होणार? या विचाराने माणसे धास्तावली आहेत.
खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तथापि कमी झालेला पाऊस आणि ऑक्टोबरची उष्णता यामुळे जमिनीतील ओलावा कमी होत आहे. त्याचा अपरिहार्य परिणाम रब्बी हंगामावर होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. महागाईने माणसांचे कंबरडे मोडले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर जात आहेत. आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. विश्वासार्हता कमालीची खालावली आहे. अनुभव कितीही कटू असले तरी आजारपणात सरकारी दवाखान्याचाच आधार घेणे हा सामान्यांचा नाईलाज झाला आहे. दोन वेळचे जेवण मिळणे अनेकांना दुरापास्त होत आहे. बेरोजगारीचा मार आहेच. नशिबाला दोष देत हा भोग भोगताना सामान्यजन एकाच प्रश्नाने हैराण आहेत. सर्व पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना सामान्यांचा कळवळा असताना त्यांचे प्रश्न मात्र ‘जैसे थे’च कसे? कोणीतही समस्या पूर्णतः का सुटलेली नाही? हा तो प्रश्न! त्याचे उत्तर जनतेला वर्षानुवर्षे सापडलेले नाही.
‘जात्यातले सुपात आणि सुपातले जात्यात’ हेच त्याचे उत्तर असेल का? विरोधक सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढतात. सत्ताधारी विरोधक झाले की, ते तीच री ओढतात. सगळेच एकमेकांवर जनतेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करतात, पण खरोखरचे जनकल्याण मात्र कोणीच करीत नाही. म्हणून त्यांची परवड होते याची खात्री आता जनतेला पटली असावी. तथापि मेळावे आणि सभांमध्ये ओसंडून वाहणाऱ्या उसण्या प्रेमाने गुदमरून लोकांचे डोके मात्र निश्चितपणे भोवंडून गेले नसेल तरच नवल! एकुण काय, तर लोकांना वेड्यात काढणे हीच राजकारण्यांची नसती उठाठेव झाली असेल तर वेड्यात किती निघायचे हे लोकांनीच ठरवायला हवे का?