Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखपरीक्षा कॉपी आणि तणावमुक्त कशा होतील?

परीक्षा कॉपी आणि तणावमुक्त कशा होतील?

विद्यार्थी आणि पालकांसह प्रशासनालाही दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेध लागले आहेत. परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठीच्या उपाययोजनाही जाहीर केल्या आहेत. या परीक्षांचा विलक्षण ताण विद्यार्थ्यांच्या मनावर असतो. त्यांच्यासाठी शिक्षणमंडळाने ऑनलाईन समुपदेशक नेमले असून त्यांचे संपर्क क्रमांकही जाहीर केले आहेत. परीक्षा तणावमुक्त आणि कॉपीमुक्तच व्हायला हव्यात. त्यासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांचे पालक आणि विद्यार्थी स्वागतच करतील. नकळत्या वयापासुन मुले शाळेत जातात. शालेय आणि विविध प्रकारच्या परीक्षा देतात. पण दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा ताण विद्यार्थ्यांच्या मनावर का येतो? कॉपी करणे बरे नव्हे, हे विद्यार्थ्यांना माहित नसते का? तरीही अनेक विद्यार्थी कॉपी करण्यास प्रवृत्त का होतात? याचा विचार संबंधित सर्वच घटकांनी करायला हवा. परीक्षा खरोखरच तणावमुक्त आणि कॉपीमुक्त व्हायला हव्या असतील तर समस्येच्या मुळाशी जायला हवे. केवळ फांद्या कापून समस्या मुळापासून सुटेल का? गुणपत्रक हीच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक ओळख मानली जाते. जास्तीत जास्त गुण मिळवणारा विद्यार्थी हुशार गणला जातो. त्याच्याउलट कमी गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यावर जगायला नालायक असाच शिक्का समाज मारतो. युग स्पर्धेचे असल्याने विद्यार्थी परीक्षार्थी झाले आहे. बहुसंख्य पालकांनाही तेच हवे असावे. बहुधा त्यामुळेच टक्केवारीचे भुत सर्वांच्याच मनावर स्वार झाले आहे. मुलांचे मार्क हे पालकांचे स्टेटस बनले आहेत. जणू काही पालकच या परीक्षेला बसलेले आहेत असे वाटावे अशीच बहुंसख्य घरातील परिस्थिती असते. मुलांच्या क्षणाक्षणावर पालकांचे लक्ष असते. त्याने सेकंदही वाया घालवू नये यावर पालकांचा कटाक्ष असतो. किती पालक मुलाची कुवत आणि त्याच्या मनाला कल लक्षात घेतात? त्यानुसारच मुलाने शिक्षण घ्यावे आणि गुण मिळवावेत याला किती पालक तयार असतात? दहावी आणि बारावीच्या परीक्षा शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. त्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी मनापासून प्रयत्न करायला हवेत हे खरे. पण त्यासाठी त्यांच्या मनातून गुणांची भीती जायला हवी, त्याचा ताण त्यांनी घेऊ नये हे किती पालक लक्षात घेतात? या सगळ्या गदारोळात विद्यार्थ्यांच्या अवस्था मात्र झापड लावलेल्या बैलासारखी होते. ते केवळ परीक्षार्थी बनतात. जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी वर्षभर धावत राहातात. तरीही स्वत:च्या कुवतीवरचा आत्मविश्वास गमावलेली काही मुले गुणांसाठी कॉपीचा आधार घ्यायला प्रवृत्त होतात. मुलांनी कॉपी करु नये यासाठी सातत्याने प्रयत्न व्हायला हवेत. मुल्यशिक्षणावर भर द्यायला हवा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्वाचा मानला जायला हवा. ज्ञान, मानवी मुल्ये आणि अंगभूत कौशल्यांवरचा मुलांचा विश्वास वाढावा यासाठी प्रयत्न केले जायला हवेत. पालकांच्या मानगुटीवर बसलेले टक्केवारीचे आणि स्पर्धेचे भुत उतरले तर विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण आपोआपच कमी होऊ शकेल. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या