धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शेष फंडातून कामे झाली नसतांना देखील लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहे. जिल्हाभरात असा कोटीचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सदस्या सुनिता शानाभाऊ सोनवणे यांनी केली. कामे न करता बिले निघालीच कशी? असा सवाल करीत सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज गोंदूर रोडवरील साई लक्ष्मी लॉनमध्ये घेण्यात आली. कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करता यावे यासाठी सभागृह सोडून मोकळ्या जागेत शारीरिक अंतर ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
डॉ. तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष, सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. सदस्यांना आपापल्या भागातील प्रश्न मांडतांनाच विकास कामे वेगाने होत नसल्याची तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवर अध्यक्ष डॉ. रंधे यांनी उत्तर देवून समाधान करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, सदस्या सुनिता शानाभाऊ सोनवणे यांनी भ्रष्टाचाराचा विषय चांगलाच गाजवला. शिरपूर तालुक्यातील करवंद येथे ग्रामपंचायत दरवाजाची तीन लाख 31 हजार रुपयांची दुरुस्ती दाखविण्यात आली आहे. मात्र ही दुरुस्ती झालेलीच नाही. याच गावांतर्गत दाखवलेला तीन लाख 18 हजार रुपयांचा सभा मंडप अस्तित्वातच नाही.
जिल्ह्याभरात अशी खोटी कामे दाखविण्यात येवून एक कोटी चार लाख रुपयांचे धनादेश तयार झाले. वास्तविक कामे करता काही बिले निघालेच कसे? सवाल त्यांनी केला. याबाबत तिर्थक्षेत्र विकासातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला असून सखोल चौकशीशिवाय बिले देवू नयेत असे मागणी या सभेत केली.