Tuesday, November 26, 2024
Homeअग्रलेखअनधिकृत फलकबाजीला आळा कसा घातला जाणार?

अनधिकृत फलकबाजीला आळा कसा घातला जाणार?

राज्यातील बहुतेक शहरांमध्ये स्थानिक सत्ताधार्‍यांकडून ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ अशी घोषणा नेहमीच केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतरण झाले की नव्याने सत्तेची सुत्रे हाती घेणारे नगरपिते शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा नारा देतात. त्या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन देतात. पण खरेच तसे घडते का? राज्यातील शहर कोणतेही असो, शहरांच्या विद्रुपीकरणात काही गोष्टी सारख्या आढळतात. शहरभर लागणारे फलक, खड्ड्यात गेलेले रस्ते, चौकाचौकातील धुळीने माखलेली शिल्पे आणि कोलमडलेली वाहतूक या त्यापैकीच काही शहरे प्रत्यक्षात सुंदर आणि स्वच्छ होण्यापेक्षा त्याचे ढोल पिटणार्‍या फलकांवरतीच शहरे सुंदर दिसतात हा लोकांचा आजवरचा अनुभव आहे. सगळ्याच शहरांमध्ये झळकणारे बेकायदा फलक शहरे विद्रुप करतात.

लोकप्रतिनिधींच्या, सत्ताधार्‍यांच्या स्वागताचे, त्यांच्या बगलबच्च्यांच्या आणि शहरांमधील स्वयंघोषित भाईदादांच्या वाढदिवसानिमित्त झळकलेले फलकच शहरांचे सौंदर्य खड्ड्यात घालतात. सार्वजनिक सणसमारंभाच्या निमित्ताने तर या फलकबाजीला चांगलाच उत येतो. यापैकी किती फलकांची रितसर परवानगी घेतलेली असते? ज्यांची छबी टाकली जाते ते किती लोकप्रतिनिधी त्यांची छबी वापरली जाणार्‍या फलकांसाठी रिससर परवानगी घ्यायला भाग पाडतात? शहरप्रेमाचा असा उसना उमाळा दाखवणारे फलक येत्या तीन दिवसात पुण्यातून काढून टाकण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेलच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. यातील काही फलक पादचारी मार्गांवर लावले गेले आहेत. ते लावताना पथ विभागाला आणि विद्युत विभागाला सुचित करण्यात आले नव्हते.

- Advertisement -

त्यासाठी बेकायदा वीजजोडण्या घेण्यात आल्या होत्या असे यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. हे वर्णन पुण्यातील फलकांसंदर्भात असले तरी राज्यातील कोणत्याही शहरांमधील फलकांना ते लागू होऊ शकेल. राज्यातील बहुतेक शहरे बेकायदा फलकांच्या समस्येने त्रासली आहेत. विद्रुप झाली आहेत. बेकायदा फलक हटवण्याचे आदेश अनेकदा दिले जातात. पण त्या आदेशाची अंमलबजावणी होते का? शहरे स्वच्छ आणि सुंदर करण्याचे आश्वासन राजकीय नेते देतात आणि त्यांचीच छबी झळकवणार्‍या फलकांचा भडीमार लोकांवर नेहमीच होतो. ते बघून गल्लीबोळातील स्वयंघोषित भाईंची देखील हिंमत वाढते. त्यांच्या वाढदिवसाचे फलक गल्लीबोळात लागतात.

भाईगिरी करणार्‍या अशा फलकांना कंटाळलेल्या कल्याणवासियांनी अनोख्या पद्धतीने बेकायदा फलक उभारणीचा निषेध व्यक्त केला होता. एका कुत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फलक कल्याणच्या पूर्वेकडील नेतवली नाका परिसरात लावण्यात आला होता. त्याचे फोटो त्यावेळी माध्यमात देखील झळकले होते. फलकबाजीला नेते तरी काय करणार म्हणा? शहर सुंदरीकरणासाठी भरीव काहीही न करता शहरवासियांची बरीच सेवा केल्यासारखे दाखवण्याचा फलक हा बहुतेक एकच सोपा मार्ग असू शकेल.

बहुधा त्यामुळेच अनधिकृत फलकबाजीला आळा घालण्याचे दावे वारंवार केले जातात. पण शहरे मात्र विद्रुप होतानाच आढळतात. आता पुन्हा एकदा पुणे परिसरातील फलक काढण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्याची खरेच अंमलबजावणी होऊ शकेल का? शहरांचे हे विद्रुपीकरण कुठे जाऊन थांबणार? या विद्रुपीकरणाला आळा कसा घालता येईल याचा विचार जाणते लोकप्रतिनिधी आणि कायदेतज्ञ करतील का? पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाचे इतर शहरे अनुकरण करतील का? 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या