मुंबई । Mumbai
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रतीक्षेत ठेवणारा निकाल अखेर प्रसिद्ध करण्यात आला.
या वर्षी राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत निकाल समाधानकारक असून विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला असून, तो ‘https://results.digilocker.gov.in’ आणि ‘https://mahahsscboard.in’ या अधिकृत वेबसाइट्सवर पाहता येईल.
यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून त्यांचा उत्तीर्णतेचा टक्का ९४.५८ इतका आहे. त्याच्या तुलनेत मुलांचा निकाल ८९.५१ टक्के लागला आहे. ही आकडेवारी पाहता मुलींचे शैक्षणिक क्षेत्रातले वर्चस्व यंदाही कायम राहिले आहे.
विभागनिहाय निकालाचा विचार करता कोकण विभागाने ९६.७४ टक्के निकालासह सर्वाधिक यश मिळवले आहे. त्याखालोखाल कोल्हापूर (९३.६४%), मुंबई (९२.९३%), संभाजीनगर (९२.२४%) या विभागांनी उच्च निकाल नोंदवले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८९.४६ टक्के लागला आहे.
प्रमुख अभ्यासक्रमांमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९७.३५% इतका असून तो सर्वाधिक आहे. त्यानंतर वाणिज्य (९२.६८%), व्यवसाय अभ्यासक्रम (८३.०३%), आयटीआय (८२.०३%) आणि कला शाखा (८०.५२%) अशी यशाची क्रमवारी आहे.
निकाल कसा पाहाल? जाणून घ्या सोपी पद्धत
- सर्वप्रथम शिक्षण मंडळाकडून निकाल प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- तिथे गेल्यावर HSC Examination Result 2025 वर क्लिक करा.
- समोर दिसणाऱ्या रकान्यात आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका.
- त्यानंतर सबमीट या बटणावर क्लिक करा