Wednesday, November 20, 2024
HomeUncategorizedकृषिदूत : द्राक्ष ठरणार आंबट

कृषिदूत : द्राक्ष ठरणार आंबट

राज्यात अवकाळी पाऊस आणि सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांची प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे द्राक्षाच्या उत्पादनाबरोबरच निर्यातीवरही विपरीत परिणाम होणार आहे. त्याच बरोबर द्राक्षांच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

अगोदरच अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला. फुलोर्‍यातील द्राक्ष बागांचे घड कुजले. त्याच बरोबर बहुतांश  द्राक्ष बागांमधील मण्यांना तडे गेले. त्यामुळे निर्यातीला आवश्यक असलेला दर्जा द्राक्षांमध्ये दिसून येत नाही. जेणेकरून काढणीला आलेल्या द्राक्षांचं मोठं नुकसान होत आहे.

- Advertisement -

द्राक्षांची सर्वाधिक निर्यात करणारा अव्वल जिल्हा म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जातो. गेल्या वर्षी या जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी एक लाख 11 हजार 684 टन इतक्या निर्यातक्षम द्राक्षांचं उत्पादन घेतलं होतं; मात्र या वर्षी द्राक्षांचं 30 टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे.

याआधी पाच हजार 54 टन द्राक्षांची निर्यात झाली; मात्र यंदा रशिया, दुबई, श्रीलंका आणि इतर देशांमध्ये फक्त 860 टन द्राक्षाची निर्यात करण्यात आली. अर्थात, उत्पादनातील घटीमुळे द्राक्षांना चांगले भाव मिळण्याची शक्यता आहे; मात्र द्राक्षांचा दर्जा चांगला राहण्याची शक्यता नाही.

बाजारात आता द्राक्षे यायला सुरुवात झाली असली, तरी त्यांना अजून म्हणावी तशी गोडी नाही. अशा स्थितीत द्राक्ष उत्पादनाचा खर्च वाढला असताना भाव चांगला मिळाला तरी त्यातून शेतकर्‍यांना फार फायदा होण्याची शक्यता नाही. थोडक्यात, शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांसाठी यंदा द्राक्षं आंबटच ठरण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या