मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..
जत्रेत मुले फिरत असताना मुलांना एकदम वाघाची डरकाळी ऐकू आली आणि मुले आईला बिलगली. संजयने मुलांना धीर देत घाबरू नका असे म्हणत हाही एक लोककलेचाच प्रकार आहे. चला आपण त्या कलाकारांना भेटू असे सांगितले.
रंगरंगोटी वाघाची अंगावर
केसाळ टोप डोक्यावर
कान, शेपटी होती पद्धतशीर
अन नृत्य वाद्याच्या तालावर ॥1॥
आला मानवी वाघ दारात
होता तो त्याच्या तोर्यात
मुलांना पाहून घाबरवत
डरकाळी फोडे तो जोरात ॥2॥
असा हा मानवी वाघ मुलांनो चला घेऊ त्याची माहिती.
मानवी शरीरावर जंगलातील वाघांसारखी रंगरंगोटी, डोक्यात केसाळ टोप, वाघासारखे कान व शेपटी अशा पद्धतीचे वाघ वाद्याच्या तालावर नाचत होते. त्यांना पाहून संजय मुलांना सांगू लागला, याला ‘मानवी वाघ’ असे संबोधले जाते. हे साधारण सर्वांना 1972 – 1974 पर्यंत दिसत होते. आपण येता-येता बहुरूपी पाहिले ना? तसाच काहीसा प्रकार होता हा लोककलेचा. हा प्रकार विदर्भ विशेषतः नागपूर परिसरात दिसून येत होता. हे पाहा मुलांनो, नीट निरीक्षण करा, तुमच्या लक्षात येईल त्यांच्याबरोबर कोणत्या गोष्टी होत्या. समोर सनई (शहनाई), ढोल, ताशे इत्यादी दिसत आहेत. याच गोष्टी त्यांच्याबरोबर असायच्या. सनईच्या गोंडी तालावर हे वाघ डरकाळी फोडत व नाचत असे. म्हणूनच आता येताना तुम्हाला डरकाळी ऐकू आली. तुम्ही जसे घाबरला तसे लहान मुलांना घाबरवण्यासाठी व त्यांची गंमत करावयास त्यांचे अंगावर हे वाघ धावून जात असे.
हे वाघ दारोदार जात असे, दारोदार गेल्यानंतर त्यांचा ताल ऐकला की लहान मुले, बायाबापड्या वाघ बघण्यासाठी घराबाहेर येत असत व गोल उभे राहत. त्यामध्ये मानवी वाघ नाचत होते.
वाघाचा कलभूत दिसे वाघाऐसा ।
परी नाही दशा साच अंगी ॥1॥
बाहेरील रंग निवडी कसोटी
संघष्टणे भेटी आपोआप ॥धृ॥
वाघाचे नुसते कातडे घेऊन त्यामध्ये भुसा भरून उभे केले तर ते खरे वाटते. पण वाघाच्या अंगी जे काही गुण असतात, ते त्या ठिकाणी नसते मुलाम्याचे नाणे कसोटीला लावले म्हणजे त्याचा खरा रंग दिसतो, म्हणजे एखाद्याशी जास्त संबंध प्रस्थापित झाले तर त्याचा स्वभाव लक्षात येतो. याच संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावरून असे लक्षात येते,
रंगरंगोटीने रंगवलेला वाघ हा वाघासारखा दिसत असला तरी तो काही खरोखरच वाघ नसतो. बाहेरील रंगावरून जरी तो तसा भासत असला तरी बारकाईने पाहिले तर सत्य कळून येते. शेवटी गुणांवरूनच खरी पारख होत असते हेच संत तुकाराम महाराज यांना आपल्या अभंगाच्या ओळीतून समजावून सांगावयाचे आहे.
खरा वाघ हा जवळून पाहता येत नसला तरी मानवी वाघाच्या जवळ जाता येते. या लोककलेतून करमणुकीबरोबरच वाघांच्या गुणांची माहिती, आपण धीटाईने जीवन जगले पाहिजे, वाघाची डरकाळी म्हणजे त्याची क्षमता, आपल्याला होते. त्याची वैशिष्ट्ये समजतात. खर्या वाघाची बल्ख करून घेता येते. त्याचा दरारा, रुबाब त्याने आपल्या कर्तृत्वातून मिळवलेला आहे, हेही लक्षात येते. वाघाच्या ठायी असलेले गुण आपण अंगिकारले पाहिजे हा उपदेशही हे कलाकार नकळत करत असायचे.
पोळा, गणपती, मस्कर्या गणपती, देवी, मारबत या सणांच्या दिवसात ‘मानवी वाघ’ असेच दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी नाचण्यासाठी येत होते. जो माणूस वाघ साकारणार असतो त्याची प्रकृती आणि व्यक्तिमत्त्व खूपच दमदार असणे आवश्यक असायचे. त्यामुळे बहुदा पहिलवान लोकच वाघ बनत होते. असेच आयुष्यभर 25-30 वेळा वाघ बनलेले लोक आजही हयात आहेत. वाघ ओळखीच्या घरांसमोर जाऊन नाचत असत, मग घर मालकांनी दिलेली चलनाची नोट तोंडात घेऊन परत जात होते.
नागपूर येथील राजे रघुजींच्या काळात राजवाड्यावर होणार्या प्रत्येक उत्सवाच्या वेळी मानवी वाघाचाच नाच होत होता.
या मानवी वाघाची रंगरंगोटी करणे हीसुद्धा एक कलाच होती. या रंगकामात पट्टेदार वाघ, ढोर्या वाघ, झेंडू वाघ, बिट्टू वाघ आदी समाविष्ट होत होते. चितारणारे पेंटर होते, त्यातील काही पेंटर आजही गावांमध्ये आढळतात.
कधी कधी कृष्ण धवल तर कधी कधी रंगीत मानवी वाघ फिरताना दिसत होते.
वाघ साकारणे सोपे नसते. यामध्ये शरीरावर रंग लावला जात असल्यामुळे शरीराची आग होत असते. नंतर लावलेला रंग आठ-दहा दिवस निघत नाही. तो घासून काढावा लागतो. त्यानेही शरीराची आग होते . या सर्व त्रासामुळे आधुनिक पिढी हा वारसा चालवायला आता तयार नाही. कारण गोंडी तालाऐवजी ते डीजेच पसंत करतात आणि म्हणूनच आता ही लोककला लोप पावताना दिसत आहे.
अशा या लोककला किमान माहितींच्या आधारे तरी जिवंत ठेवणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.
चला मुलांनो, पटकन वाघाच्या हातात हात मिळवा आपल्याला पुढची कला पाहायची आहे.