नंदुरबार | प्रतिनिधी – NANDURBAR
तालुक्यातील धानोरा येथे गेल्या दोन दिवसात तहसीलदार पुलकित सिंह यांनी कारवाई करून विना परवाना साठा करून ठेवलेला धान्य साठा जप्त केला असून दुकाने सिल केली आहेत.
दि. ६ जून रोजी संध्याकाळी धानोरा ता. नंदुरबार येथील प्रो.धनेश मोहनदास सेवलानी (रा.नंदुरबार) यांच्या श्री. शनेश्वर ट्रेडींग, अन्न धान्य विक्री दुकानाची तहसिलदार पुलकित सिंह यांनी अचानक तपासणी केली. त्याठिकाणी शासनाची कोणतीही परवानगी न घेता अथवा कोणताही परवाना नसतांना २९३ क्विंटल गव्हाचा साठा आढळुन आला. म्हणुन सदर दुकान सिल करुन श्री शनेश्वर ट्रेडींग, अन्नधान्य केंद्र संचालक धनेश मोहनदास सेवलानी यांनी किरकोळ मर्यादापेक्षा जास्त गहु साठा साठवणुक केल्यामुळे त्यांच्याविरुध्द जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ अन्वये कारवाई करण्यांत आली आहे.
दि.७ जुलै रोजी सकाळी १० वाजता धानोरा बस स्टॉपचजवळील शिव शंकर निवासच्या तळमजल्यावर चंद्रकांत पुंजाराम चौधरी यांच्या घरात ३२८ क्विंटल गहु व त्यांच्या नांवे असलेल्या दुकानात ९ क्विटल ३० किलो गहू व तांदुळ ५ क्विटल ६६ किलो तांदुळ अवैधरित्या कोणताही परवाना न घेता साठवणुक करुन ठेवल्याचे आढळुन आले. म्हणून चंद्रकांत पुंजाराम चौधरी व हिरामण पुंजाराम चौधरी (रा. धानोरा ता. नंदुरबार) यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ अन्वये कारवाई करण्यांत आली आहे. तसेच त्यांच्या शिवसागर ट्रेडींग धान्य खरेदी विक्री केंद्र डीडीसी बँकच्या समोर असलेल्या शॉपींग सेंटरच्या ३ गाळयामध्ये ५८३ क्विंटल सोयाबीन साठादेखील आढळुन आला आहे. तोदेखील सिल करण्यात आला आहे. परवानाधारकाचा लेखी खुलासा घेवुन त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यांत येणार आहे.
धानोरा येथील जि. प. शाळेजवळील मदनलाल बनवारीलाल अग्रवाल यांच्या मालकीच्या गोदामाची तपासणी केली असता त्याठिकाणी गहु ४५ क्विंटल, बाजरी ६ क्विटल व ऐरंडी ४० क्विटल व कापुस ५० क्विंटल आढळून आले आहे. याबाबत मदनलाल अग्रवाल यांचादेखील लेखी खुलासा घेण्याची कारवाई सुरु आहे. तसेच मुख्य बाजारातील ताराकाशेठ यांच्या नांवे असलेल्या धान्य दुकानाची तपासणी करण्यांत आली व त्यांचादेखील लेखी खुलासा घेवुन त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यांत येणार आहे.