नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon
नांदगाव -चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड टोल नाक्याजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला. यामध्ये तालुक्यातील पिप्राळे येथील पती -पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून चारचाकी व दुचाकी चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवार( दि.३०) दुपारी २:३० वाजेच्या सुमारास नांदगाव – चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड टोल नाक्याजवळ दुचाकी क्रमांक एम.एच. 15 बी.आर 7085 आणि चारचाकी क्रमांक एम.एच. 20 जी .के. 6457 या वाहनाची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजुला असलेल्या नाल्यात फेकली गेली . जखमींना येथील ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले .अपघातात भाऊसाहेब बंडू माळी (वय 45 )व मंगलबाई भाऊसाहेब माळी (वय 40 )या पती पत्नीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अमोल भाऊसाहेब माळी(मुलगा)हा बचावला आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी ,सुनील बढे आणि स्थानिकांच्या मदतीने मदत व बचावकार्य करण्यात आले .प्राथमिक माहितीनुसार दोन्हीही वाहने वेगात धावत होती. त्यामुळे, अपघात एवढा भीषण झाला की दुचाकी व कारही नाल्यात जाऊन पडली. कारमधील प्रवासी गंभीर जखमी असून कारचेही अतोनात नुकसान झाले आहे. तर, दुचाकीही चेंदामेंदा झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या घटनेनं पिप्राळे गावांवर शोककळा पसरली आहे.