अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
हद्दपार असतानाही भिंगार परिसरात परत येऊन पती-पत्नीवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अक्षय हम्पे व त्याच्या अन्य साथीदारांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 जुलै रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास भिंगारमधील देशमुख कॉलनी येथील श्रीराम फर्निचरजवळ घडली.
या प्रकरणी विकीसिंग सुबेसिंग तनवर (वय 29, रा. पंचशील नगर, भिंगार) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी अक्षय हम्पे, प्रतीक लालबोंद्रे, विशाल लालबोंद्रे व त्यांच्यासह 10 ते 12 अनोळखी इसमांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व त्यांची पत्नी ज्योती यांच्यावर लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण खूनाचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या वाहनाची तोडफोड करून नुकसान केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात संशयित आरोपींनी जिल्हादंडाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचेही उल्लंघन केले.
विशेष म्हणजे मुख्य संशयित आरोपी अक्षय हम्पे हा पूर्वीच हद्दपार असूनसुद्धा त्याने नियम तोडून भिंगारमध्ये प्रवेश केला आणि थेट खूनी हल्ला घडवून आणला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.




