नाशिक। प्रतिनिधी Nashik
मुलाकडून होणारी सततची मारहाण व मुलीच्या प्रेमविवाहास विराेध असल्याच्या नैराश्यातून पत्नीसमवेत झालेला वाद विकोपाला गेल्याने मद्यपि पतीने कोयता अन् कुकरच्या झाकणाने मारहाण करुन पत्नीचा निर्घृण खून केल्याची कबुली संशयित पतीने दिली आहे.
याप्रकरणी संशयित पतीला न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
छत्रगुण मुरलीधर गोरे (५०, रा. स्वस्तिक अपार्टमेंट, प्रमोदनगर, गंगापूर रोड) असे संशयिताचे नाव आहे. तर, सविता छत्रगुण गोरे (४५) असे मृत पत्नीचे नाव आहे. मुलगी मुक्ता बालाजी लिखे (२८, रा. मयुरी सोसायटी, चव्हाणनगर, पंपींग स्टेशन) यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
गंवडी काम करणारा छत्रगुण यास मद्याचे व्यसन होते. त्यातून त्याचा मुलगा चिडचिड करुन त्याला सतत मारहाण करत होता. तर त्याच्या मुलीने प्रेमविवाह केला होता. याच कारणातून त्याचे आणि मयत पत्नी सविता हिच्याशी वाद होत होते. मंगळवारी (ता. ४) सकाळी साडेअकरा-बाराच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
यामुळे त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने कोयत्याने पत्नी सविताच्या कानावर वार केला. त्यानंतरही त्याने रागात जवळच असलेले कुकरचे झाकणाने तिच्या डोक्यात बेदम मारले. यात झाकणही वाकले होते. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यानंतर तो मुलगी आल्यानंतर पसार झाला होता.