मुंबई | Mumbai
ड्रीम इलेव्हन आयपीएलमध्ये शुक्रवारी सनराईझर्स हैद्राबाद आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे.
मुंबईविरुद्ध सलामी सामन्यात विजय मिळवल्यानंतर चेन्नईला राजस्थान आणि दिल्ली दोघांविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.
शिवाय मागील २ सामन्यांमध्ये दुखापतीमुळे आघाडीचा फलंदाज अंबाती रायडू आणि अष्टपैलू डीजे ब्रावो खेळू शकले नव्हते. त्यांच्याजागी ऋतुराज गायकवाड आणि सॅम करण यांना संधी देण्यात आली होती. पण दोघांनाही याचा फायदा उठवता आला नाही.
आता हैद्राबादविरुद्ध दोघेही संघात पुनरागमन करणार असल्यामुळे चेन्नई संघाची ताकद वाढणार आहे. तर दुसरीकडे हैद्राबादने कोलकता आणी बंगळूर यांच्याविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर दिल्लीविरुद्ध दमदार पुनरागमन करून आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली होती.
त्यामुळे चेन्नईविरुद्ध आपली विजयाची लय अशीच कायम ठेवण्यासाठी हैदराबाद काय रणनीती आखतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर मागील २ पराभवांमुळे पराभवाच्या गर्तेत सापडलेला सुपरकिंग्ज विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी सज्ज झाला आहे.
चेन्नई संघाच्या फलंदाजीची मदार फाफ डू प्लेसिस , शेन वॉटसन , अंबाती रायुडू , ऋतुराज गायकवाड , केदार जाधव , एम एस धोनी यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये डीजे ब्रावो , मिचेल सॅन्टेनर , रविंद्र जडेजा , सॅम करण आहेत. गोलंदाजीत शार्दूल ठाकूर , दीपक चाहर , पियुष चावला , रविंद्र जडेजा के एम असिफ , मोनू कुमार , जोश हेझलवूड आहेत.
हैदराबाद संघाच्या फलंदाजीची मदार डेविड वॉर्नर , केन विलियम्सन , मनीष पांडे , जॉनी बेरस्टो , प्रियम गर्ग , वृद्धिमान सहा , विराट सिंग यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये मोहंमद नबी , विजय शंकर , अभिषेक शर्मा , जेसन होल्डर आहेत.
गोलंदाजीत संदीप शर्मा , भुवनेश्वर कुमार , बेसिल थंपी , टी नटराजन , खलील अहमद , रशीद खान आहेत. हैदराबाद संघासाठी जमेची बाजू म्हणजे डेविड वॉर्नर , जॉनी बेरस्टो , मनीष पांडे लयीत आहेत.
त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. गोलंदाजीत रशीद खान , भुवनेश्वर कुमार विकेट काढण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. त्यांना लवकरच यातून तोडगा काढणे गरजेचे आहे. दिल्लीविरुद्ध सामन्यात राशीदने दिल्लीच्या तीन महत्वपूर्ण विकेट्स काढून संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.
चेन्नई संघासाठी जमेची बाजू म्हणजे फाफ डू प्लेसिस चांगली कामगिरी करत आहे. मात्र संघासाठी डोकेदुखी म्हणजे शेन वॉटसन , धोनी , केदार जाधव अद्याप मोठी खेळी करू शकलेले नाहीत. त्यांना आपली कामगिरी सुधारण्याची संधी आहे. गोलंदाजीत दीपक चाहर , सॅम करण चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना आपली कामगिरी सुधारण्याची संधी आहे.
– सलिल परांजपे, नाशिक