मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील हिंदी सक्तीविरोधात राज-उध्दव ठाकरे बंधू एकत्र आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जोरदार भाषण करत राज्यात हिंदीची सक्ती चालणार नाही. मराठीसाठी सर्वांनी एकत्र आलेच पाहिजे. मराठीचा अपमान, अवमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. मराठी बोलणार नाही, असा माज करणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहन राज ठाकरेंनी केले. व्यावसायिक सुशील केडियाने राज ठाकरेंना आव्हान दिले आणि त्यानंतर माफी मागितली. दरम्यान, एका माजी कमांडो फोर्स सैनिकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रश्न उपस्थित केला आहे.
काय म्हंटले आहे सैनिकाने?
या सैनिकाचे नाव प्रवीण कुमार तेवतिया आहे, त्यांनी विचारले आहे की, मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी तुमचे योद्धे कुठे होते? 26/11 च्या मुंबई हल्ल्यात प्रवीणने अनेक लोकांचे प्राण वाचवले होते. ताज हॉटेलमधील १५० लोकांना वाचवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता या सैनिकाने राज ठाकरेंना उद्देशून म्हटले आहे की मी उत्तर प्रदेशचा आहे. मी महाराष्ट्रासाठी माझे रक्त सांडले आहे. भाषेच्या नावाखाली देशाचे विभाजन करू नका, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
प्रविण कुमार तेवातिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधलाय. तेवतिया यांनी २००८ मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये १५० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले होते. त्यांनी आता मराठी आणि हिंदीच्या वादात उडी घेतली आहे. तेवातिया यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले की,” 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी मी मुंबई, ताज वाचवले. मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले. पण मी यूपीचा आहे. राज ठाकरेंचे तथाकथित योद्धे तेव्हा कुठे होते? देशाला विभागू नका.”
प्रवीण कुमार तेवतिया हे मरीन कमांडो फोर्स (मार्कोस) मध्ये होते. तेवतिया यांनी स्वतःचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. यामध्ये ते गणवेश परिधान करून हसत आहेत. त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर यूपी लिहिलेले आहे आणि त्यांच्यी हातात रायफल देखील आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टला रिट्वीट करत तेवतिया यांनी म्हटले की, भाषेच्या नावावर देशाला विभागणे चुकीचे आहे.
तेवातिया यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आपली भूमिका कायम ठेवत हिंदीच्या कथित सक्तीविरोधात आवाज उठवला आहे. हा वाद आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





