Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधमी ती अन् टी...

मी ती अन् टी…

प्रतिभा खैरनार, नांदगाव, नाशिक

धुसर होत चाललेली रात्र अन् डोक्यावर हळूवारपणे गोंजारणारी पहाट. यांचे नाते काहीसे प्रियकराचा हात सोडून अनोळखी पुरुषासोबत सात फेरे घेण्यासाठी सज्ज झालेल्या नववधूसारखेच.. जबाबदारी कानात भुनभून करत असते अन् निद्रा तिच्या कवेतून मला सोडायला तयार नसते. निद्रेला झटकून ब्लँकेटचा हात सोडत बेडवरून, मी घराबाहेर पडलो मॉर्निंग वॉकसाठी. अंगावर गरम स्वेटर अन् ऊबदार मफलर होतीच सोबतीला. भास्कराची सोनेरी किरणे डोळ्यांना गुदगुल्या करत होते. अवनीच्या सर्वांगावर ते अधिराज्य गाजवत सुटले. हिरे, माणिक, मोत्यांच्या आभूषणांनी एखादी लावण्यवती सजावी तसेच दवांची आभूषणे लेवून गवताचे पाते सजून धजून वाटेच्या दुर्तफा उभे स्वागतासाठी…वाटेवरचे दाट धुके प्रेयसीच्या छळणार्‍या आठवणींसारखेच…

- Advertisement -

सोबत मित्रांची टोळी असली तरी थंडीमुळे सगळ्यांचे ओठ शिवलेले अन् शब्द गोठलेले. ती गुलाबी थंडी मला माझ्या बायकोसारखीच वाटते. ती रागावल्यावर कितीही कुडकुडत बसावे लागले तरी हवीहवीशीच वाटते. तळहात एकमेकांवर घासत वाट तुडवत आम्ही निघालो. थिजलेल्या पावलांना चौकातल्या अमृततुल्यची आठवण आली तेव्हा त्यांनाही गती आली. दिवाळीच्या सणाला सासूरवाशीणीला माहेरची ओढ लागते तशीच ओढ लागते गुलाबी थंडीत वाफाळत्या चहाची. मग तो गुळाचा राहो नाहीतर साखरेचा अथवा ब्लॅक टी…

पंधरा-वीस पावलांवर अमृततुल्य राहिले पण जरा चालून चालून दम लागला म्हणून वाटेच्या कडेला एका मोठ्या दगडावर बसलो विसाव्याला…वय झाले की भिंतीवरच्या कुजलेल्या खुंटीसारखे होते जगणे…भिंतीला तर असते पण तिला ओझे अडकवायची कोणाची हिंमत होत नाही. बरोबरच्या मित्रांचा झुंड पुढे निघून गेला. शेवटपर्यंत सोबत नसतोच कोणी तसाही..

शेजारीच तंबू ठेकून एक चिमणा-चिमणीचे जोडपे नवा संसार थाटायची तयारी करून, फाटलेल्या संसाराला थिगळे लावण्याची यातायात चाललेली. उघडी नागडी पोरं गोणपाटावर हिवळत बसलेली. त्यांचे लाल टमाट्यासारखे गाल थंडीमुळे खरबुजासारखे उललेले. त्या पोरांकडे पाहून मला अंगावरच्या महागड्या ऊबदार स्वेटरचे ओझे वाटायला लागले अन् मफलर तर गळ्याचा फास वाटायला लागली. गुलाबी थंडीच्या प्रेमाचे गारूड पार उतरून गेले. ती थंडी आता बोचायला लागली… तंबूमधल्या सुगरणीने तीन दगडांची चूल केली. तिच्यावर चहासाठी काळे बुडाचे पातेले ठेवले.

चहा उकळायला लागला. इकडे तलफेची हुक्की अनावर झाली. काही वेळातच त्याने माझ्यासमोर कप बशीत वाफाळता अद्रक घातलेला चहा आणून ठेवला. एक एक घोटाची चव जिभेवर रेंगाळत चहा संपवला. खिशातून एक नोट काढून पोरांच्या हातात दिली. त्यांना बोचणार्‍या थंडीत एका गुलकाडीची ऊब मिळावी इतकाच हेतू. तिथूनच माघारी फिरत घराकडे निघालो. दुसर्‍या दिवशी अमृततुल्यची गर्दी तंबूभोवती दिसली अन् बोचरी थंडी पुन्हा गुलाबी झाली… मी…ती गुलाबी थंडी अन् सोबत गरमागरम टी…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या