Friday, June 21, 2024
Homeअग्रलेखवाटते मजला मी पक्षी व्हावे 

वाटते मजला मी पक्षी व्हावे 

समाजात पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता वाढत आहे. माणसे त्यांच्या परीने मार्ग शोधतात. झाडे लावतात. ती वाढवतात. गच्चीवर बाग फुलवतात. कचरा व्यवस्थापन करून त्या बागेचे खत घरातच तयार करतात. भटक्या जनावरांसाठी निवारे उभारतात. त्यांच्यासाठी अनाथालये चालवतात. नागपूरमधील एका व्यक्तीने अनोखा मार्ग शोधला आहे. अनेकांच्या घरात लग्नपत्रिकांचा गठ्ठा साठतो.

- Advertisement -

लग्नसोहळा पार पडल्यावर त्याचे काय करायचे असा प्रश्न सर्वांनाच सतावतो. त्यावर पर्यावरणपूरक उत्तर नागपूर मधील अशोक तेवानी यांनी शोधले आहे. ते ७२ वर्षांचे आहेत. लग्नपत्रिकांपासून ते पक्षांची घरटी तयार करून वाटतात. १२ वर्षांपासुन ते हा छंद जोपासतात. त्यांनी आत्तापर्यंत अडीच हजारांपेक्षा जास्त घरटी वाटली आहेत. ज्यात तऱ्हेतऱ्हेच्या पक्षांनी त्यांचा संसार थाटला आहे. आपण निसर्गाचे देणे लागतो. त्यामुळे निवृत्तीनंतर हे काम करायचे असे ठरवलेच होते असे त्यांनी माध्यमांना सांगितले. त्यांचे काम प्रेरणादायक आहे. झाडांची आणि झाडांवर अवलंबून असलेल्या पक्षांची संख्या रोडावत आहे. पक्षीतज्ज्ञ त्याबद्दल सातत्याने समाजाचे लक्ष वेधून घेत आहेत. पक्षांविषयीचे प्रेम म्हणा किंवा जागरूकता म्हणा, पक्षांची सामुदायिक आठवण संक्रांतीला येते. मांजा हटाव मोहीम राबवली जाते. ती गरजेची आहेच. तथापि तीच जागरूकता आणि प्रेम कायमस्वरूपी जोपासले जाऊ शकते.

अनेकांच्या गच्चीवर बाग असते. पक्षांना आकर्षित करण्यासाठी एखाद्या कुंडीत गवत वाढू द्यावे. मातीच्या पसरट भांड्यात पाणी आणि मातीच्याच भांड्यात बारीक रेती ठेवता येऊ शकेल. पक्षी मातीस्नान देखील करतात. शक्यतो त्यांना खाण्यासाठी काहीच ठेऊ नये असे निसर्गप्रेमी शेखर गायकवाड सुचवतात. अळ्या हे त्यांचे खाद्य आहे. अन्न ठेऊ नये. ठेवायचेच असेल तर कडधान्य ठेवावे असे ते सांगतात. पक्ष्यांचे आयुष्य समजावून घेण्यासाठी त्यांच्या निरीक्षणाचा छंद मुलांना लागावा यासाठी पालक प्रयत्न करू शकतात. तो छंद तुम्ही तुमच्या घराच्या खिडकीत बसून देखील जोपासू शकता.

खिडकीतून रोज दिसणारे पक्षी, त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा. त्यांच्या ठराविक सवयी यांच्या नोंदी ठेवता येऊ शकतील. शाळा देखील यात सहभागी होऊ शकतात. ठराविक काळाने विद्यार्थ्यांना शिवारफेरीचा गृहपाठ दिला जाऊ शकेल का? शिवार फेरीत विद्यार्थी त्यांच्या परिसरातील झाडांची, त्यावर आढळणाऱ्या पक्षांची, फिरणाऱ्या प्राण्यांची माहिती गोळा करू शकतील. यामुळे मुलांना त्यांच्या परिसराची, निसर्गाची देखील माहिती मिळू शकेल. त्यांचा परिचय वाढेल. यानिमित्ताने त्यांच्या पक्षीतज्ज्ञाशी संवाद आयोजित करता येऊ शकेल. पक्षांना कोणती झाडे आवडतात, कोणत्या झाडांवर पक्षी घरटे करत नाहीत किंवा करतात याविषयी माहिती दिली जाऊ शकेल. नागपूरमधील तिवारींनी त्यांच्या परीने मार्ग शोधला. लोकही त्याच वाटेवरचे पांथस्थ होऊ शकतात. निसर्गप्रेमाचा संस्कार जाणीवरपूर्वकच केला जायला हवा. त्याशिवाय मुलांना देखील माणसाचे अस्तित्व निसर्गावरच अवलंबून आहे हे कसे कळणार? त्याची जाणीव करून देण्यातच माणसाचे भले दडले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या