मुंबई | प्रतिनिधी
शिवसेना नेते रामदास कदम यांचे मानसिक संतुलन ढासळले असून त्यांना मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेण्याची आवश्यकता आहे. त्यांनी माझ्यावर केलेले आरोप निराधार आणि कल्पोकल्पित असून, याप्रकरणी त्यांना कायदेशीर नोटीस पाठविणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी दिला.तसेच यापुढे कदम यांच्या प्रत्येक वक्तव्याला उत्तर देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेवरून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. रामदास कदम यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचा आधी खुलासा करावा. स्वतःची प्रतिमा नेमकी काय आहे, हे त्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे, असा टोला तटकरे यांनी लगावला. कदम यांनी माझ्यावर केलेले आरोप निराधार असून, त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रामदास कदम विधानसभेचे विरोधी पक्षनेते होत असताना ते माझ्याकडे हातापाया पडत आले होते. त्यावेळी मी त्यांना माझ्या गाडीतून अजित पवार यांच्याकडे घेऊन गेलो होतो. त्यानंतरच ते विरोधी पक्षनेते झाले. आपण सांगत असलेली ही बाब खरी की खोटी, हे कदम यांनीच स्पष्ट करावे, असे आव्हानही तटकरे यांनी दिले.
दरम्यान कदम यांच्याकडून वारंवार निराधार आरोप केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यात अर्थ नाही. यापुढे त्यांच्या कोणत्याही विधानावर प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, ज्या प्रकरणात कायदेशीर लढा देण्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.




