मुंबई | Mumbai
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे. मेट्रोवूमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आहे.
अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीचे पत्रही समोर आले आहे. या पत्रात शासनाने आपली बदली केल्याची माहिती अश्विनी भिडे यांना देण्यात आली आहे. यासोबत मंत्रालयात मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुंबई ब्रिजेश सिंह यांच्या जागी आपली नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आपण ब्रिजेश सिंह यांच्याकडून त्वरित पदभार स्विकारावा असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत मेट्रोच्या पदाचा कार्यभारही सांभाळावा, असे आदेश भिडे यांना देण्यात आले आहेत.
आयएएस अधिकारी अश्विनी भिडे या ‘मेट्रो व्हूमन’ म्हणून ओळखल्या जातात. त्या आरेमधील झाडे मेट्रो कारशेडसाठी तोडल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. पण त्यानंतर २०१९ मध्ये मविआचे सरकार आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. परंतु, २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आलेल्या युतीच्या सरकारमध्ये त्यांना पुन्हा मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदी नेमण्यात आले. मेट्रो व्हूमन अश्विनी भिडे या कायमच मेट्रोच्या कामांसंदर्भातील माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
अश्विनी भिडे या १९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील २५ वर्षांचा अनुभव आहे. मुंबईतील मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.