अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सध्या राज्यभर गाजत असलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ.प्रविण गेडाम यांनी सोमवारी दिले आहेत. नगरचे जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणाची चौकशी करून विभागीय पातळीवर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, सोमवारी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रासह त्यासाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिली आहेत.
प्रशिक्षणार्थ आयएएस अधिकारी पुजा खेडकर आणि त्यांच्या कुटूंबाचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. पुजा खेडकर यांनी ज्या दोन अपंग प्रमाणपत्राच्या आधारे आयएएस पास केले ते दोन अंपग प्रमाणपत्र नगर जिल्हा रुग्णालयातील तीन डॉक्टरांच्या पॅनलने मंजूर केलेले आहे. खेडकर यांचे प्रकरण उजाडात आल्यानंतर त्यांच्या पदवीसह आयएएस पासिंगसाठी सादर करण्यात आलेली प्रमाणपत्र यावर खल सुरू असतांना आता विभागीय महसूल आयुक्त डॉ. गेडाम यांनी नगरच्या जिल्हाधिकार्यांना पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानूसार जिल्हा रुग्णालयाकडून जिल्हाधिकारी सर्व माहिती घेवून अहवाल विभागीय पातळीवर पाठवणार आहेत. त्यानूसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी वादग्रस्त पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्राची कागदपत्रे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना सादर केले आहेत.