प्रेम.. या जगातली सर्वात सुंदर गोष्ट. इतिहासात आजवर ज्यांनी ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलंसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो किंवा हीर रांझा, रोमिओ ज्युलिएट असोत किंवा सोनी महिवाल.. प्रेम ही जगातली एक सुंदर भाषा आहे. ज्याने ही भाषा शिकली त्यालाच ती उमगते आणि एका नवीन, स्वर्गाहून सुंदर जगाचा शोध त्याला लागतो. असंच एक अस्सल मराठमोळं प्रेमी युगुल आहे मल्हार मायडी.
ही जोडी इभ्रत नावाच्या प्रेमकथेतून रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. डॉल्फिन सिनेक्राफ्ट या बॅनरखाली श्रुती वसंत दांडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रवीण रमेश क्षीरसागर यांनी इभ्रतच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात संजय शेजवळ, शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा असे प्रमुख कलाकार दिसणार आहेत.
या चित्रपटाला बबन अडगळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिलं असून चित्रपटाचे डीओपी भारत पार्थसारथी असणार आहेत. इभ्रतची कथा अण्णाभाऊ साठे यांची आहे. तर तिकीटबारीवर तुफान गाजलेल्या रेडू आणि टकाटक या चित्रपटाचे लेखक संजय नवगिरे यांनी ‘इभ्रत’ या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.
या चित्रपटाला सुबोध नारकर यांनी संकलित केलं असून अनिल वाथ यांनी या चित्रपटाचं कला दिग्दर्शन केलं आहे. नरेंद्र पंडीत यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. तरल आणि नितळ प्रेमाची गोष्ट सांगणारा इभ्रत 21 फेब्रुवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.