मुंबई | Mumbai
आयसीसी विश्वचषक 2023 मधील पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने 397 धावा केल्या होत्या. उत्तरादाखल न्यूझीलंडचा डाव 327 धावात संपुष्टात आला. भारताकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतकी तर गोलंदाजी मोहम्मद शमीने 7 विकेट घेतल्या. तसेच कुलदिप यादव 1, जसप्रीत बुमराहला 1 विकेटवर समाधान मानावं लागलं.
भारताच्या 398 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने पहिल्या पाच षटकांत एकही विकेट गमावली नाही. पण त्यानंतर मोहम्मद शमीने आपल्या पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडला धक्का दिला. शमीने डेव्हॉन कॉनवेला 13 धावांवर बाद केले. त्यानंतरच्या षटकात पुन्हा एकदा शमीने न्यूझीलंडला धक्का दिला. शमीने यावेळी फॉर्मात असलेल्या रचिन रवींद्रला 13 धावांवर बाद केले. पण त्यानंतर केन विल्यमसन आणि डॅरिल मिचेल यांच्यामध्ये चांगली भागीदारी झाली. या दोघांनी तिसर्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. यावेळी केनला धावचीत करण्यात लोकेश राहुलने मोठी चूक केली. त्यावेळी केन हा 39 धावांवर होता.
या जीवदानाचा त्याने चांगला फायदा उचलला. कारण केनने त्यानंतर मिचेलबरोबर मोठी पार्टनरशिप रचली. मिचेल आणि केन या दोघांनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. त्यामुळे ही जोडी भारताला धक्के देणार असे वाटत होते. पण त्यावेळी पुन्हा एकदा शमी भारताच्या मदतीला धावून आला. रोहितने यावेळी शमीवर विश्वास ठेवला आणि त्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. कारण शमीने यावेळी एकाच षटकात दोन विकेट्स मिळवल्या. शमीने प्रथम केनला बाद केले. तो 69 धावांवर आऊट झाला. त्यानंतर शमीने टॉल लॅथमचा काटा काढला आणि संघाला एकाच षटका दुहेरी यश मिळवून दिले. पण तरीही डॅरिल मिचेल हा खेळपट्टीवर होता आणि तोच भारतासाठी धोकादायक ठरत होता. त्यानंतर शमीने अचूक गोलंदाजी करत न्यूझीलंडला एकामागून एक धक्के देत त्यांच्या धावांना वेसण घातले. त्यामुळे सेमी फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय मिळवता आला.
तत्पूर्वी भारताने विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकांच्या जोरावर 397 धावांचा डोंगर रचला. कोहलीने यावेळी आपले 50वे एकदिवसीय शतक साजरे करत वर्ल्ड रेकॉर्ड रचला. कोहलीने यावेळी सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडीत काढला. कोहलीने यावेळी नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 117 धावा केल्या. कोहलीपेक्षा यावेळी श्रेयस जास्त जलद खेळला. कारण श्रेयसने यावेळी फक्त 70 चेंडूंत चार चौकार आणि आठ षकारांच्या जोरावर 105 धावांची खेळी साकारली. भारताने सेमी फायनलमध्ये फलंदाजीत आपली कामगिरी चौख बजावली होती. पण शमी वगळता अन्य गोलंदाजांनी मात्र निराश केले.